हम्पी....वास्तुकलेचे साम्राज्य .. भाग १
भारत आणि भारताचा इतिहास प्रचंड वितृत असून जितका समजून घ्यावा तितका कमीच आहे. कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीच्या किनार्यावर वसलेले हम्पी हे एक भव्य अश्या वास्तु संकल्पनेचा आणि रचनेचा अविष्कार आहे असा मला वाटत. पुण्याहून १० तासाच्या अंतरावर दक्षिणेत कर्नाटक राज्यात विजयानगर साम्राज्य आहे तेच "हम्पी". यालाच आपण रामायणातील किश्किंदा साम्राज्य असेही म्हणू शकतो . आश्चर्य म्हणजे या साम्राज्याचे अस्तिव, त्याचा जिवंतपणा अजूनही जाणवतो आणि त्याचे साक्षीदार म्हणजे तेथील अत्यंत जुने भव्य दिव्य अशी देवालये, वास्तू , मुर्त्या आणि शिळा.
वास्तु संकल्पना,रचना, इतिहास, वास्तुशात्र, उत्खनन या सारख्या विषयांची आवड असणार्यांसाठी हम्पी म्हणजे वरदानच आहे. भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक विद्यार्थी येथे संशोधनासाठी येतात. पुणे ते हम्पी हा मार्ग अत्यंत सुंदर आणि हिरवळीने नटलेला आहे त्यामुळे इथे पोहचण्यासाठी तुम्ही रोड ट्रीपचा सुद्धा विचार करू शकता.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही हम्पी पाहायच बेत केला. रात्री पुण्याहून सुटणाऱ्या ९ च्या VRL ने आम्ही हम्पी साठी प्रस्थान केले आणि सकाळी ८ च्या दरम्यान आम्ही होस्पेट ला पोहचलो. होस्पेट पासून हम्पी १३ किमी असून होस्पेट वरून ५ -५ मिनिटांमध्ये हम्पीसाठी बसेस उपलब्ध आहेत.बस सेवा पहाटे ५ पासून रात्री ११ पर्यंत चालू असते. बस आणि रिक्षा सहज उपलब्ध असल्यामुळे आम्ही हम्पी मधील ४-५ दिवसांचा प्रवास बसने आणि रिक्षा नेच करायच ठरवलं त्यामुळे त्या भागातील सामान्य जीवन सुध्या जवळून पाहायला मिळालं . होस्पेट आणि हम्पी मध्ये राहण्याची उत्तम सोय आहे . पण होस्पेट ते हम्पी ये जा टाळायची असेल (१३ किमी) तर तुम्ही हम्पीमध्ये राहू शकता. हम्पीच्या लोकल मार्केट मध्ये आणि तुंगभद्रा नदीच्या पलीकडच्या भागात स्थानिक लोकांनी प्रवाश्यांसाठी उत्तम अशी राहण्याची सोय केली आहे आणि ते हि अत्यंत मुबलक दरात. (२०० ~ १००० ) .
मस्त फ्रेश होऊन आम्ही हम्पी पाहायला निघालो. हम्पीला पोह्च्यापुर्वीच रस्त्याच्या दुतर्फा हिरव्या गार केळीच्या बागा आणि प्रचंड शिळा आपले स्वागत करताना दिसतात. त्या अवाढव्य अशा शिळा आणि दगडांचे दुमजली स्थर पाहून आपणही जुन्या काळातील साम्राजात आलो आहोत की काय असच भासायला लागतं. "हम्पी"बस स्थानकावर बस थांबली आणि चारही बाजूला नजर टाकली, जिथे बघावं तिथे सगळीकडेच भव्य दगडी मंदिरे, प्रचंड मोठ्या शिळा आणि त्यांचेच डोंगर. हे सगळं म्हणजे "विजयानगर " साम्राज्य आणि कृष्णदेवराय राजवाटीची झलकच होती.
हम्पी चा इतिहास आणि तेथील महत्वाची ठिकाण पाहण्यासाठी आम्ही दिवसभरासाठी एक रिक्षा ठरवली . प्रत्येक ठिकाणी त्या त्या जागेची माहिती देणारे बोर्ड आहेत त्यामुळे सगळीकडे आपल्याला गाईड घेण्याची गरज नाही. मात्र "विठ्ठल मंदिर" या ठिकाणचे आश्चर्य ऐकण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मात्र गाईड घेणे अत्यंत गरजेचा आहे.
आकाराने मोठ्या अशा गणरायाला नमन करून आम्ही हम्पीच्या दर्शनाला सुरुवात केली."सासिवेकालु" असे त्याचे नाव . या एकाच पाषाणात घडवलेल्या,
गणपती बाप्पाच्या दर्शानंतर आम्ही ६. ५ मीटर उंच असलेल्या लक्ष्मी -नरसिंहाच्या मूर्तीला भेट द्यायला आलो. लक्ष्मी -नरसिंहाच्या मुर्तीपैकी फक्त नरसिंहाचे दर्शन घडते जी पद्मावास्थेत असून मूर्तीचा मुखवटा,डोक्यावरील शेषनाग याची स्थिती उत्तम आहे. लक्ष्मीच्या मूर्तीचे काही भग्नावस्थेतील भाग पाहायला मिळतात .
शेजारीच असलेली "बडविलिंग" या एकाच काळ्या पाषाणात घडवलेली शंकराची पिंड आपले लक्ष वेधून घेते. शंकराची ही पिंड सतत पाण्यातच असते हेच त्याचे विशिष्ट आहे. पिंडीवरील नीट पहिले असता बेलाचे एक नाजूक पान कोरलेले दिसते
यानंतर आम्ही "अच्युतराया" मंदिरात गेलो. विस्तार प्रचंड असल्यामुळे भव्य असे हे मंदिर एका नजरेत भरतच नाही. मंदिराचा मुख्य दरवाजा लहान असून उंची प्रचंड आहे. मुघलांनी केलेल्या आक्रमणामुळे येथील मंदिर भग्नावस्थेत असून इथे पूजा होत नाही. बर्यापैकी सगळ्याच मंदिरांमध्ये मुर्त्या नसल्यामुळे मुख्य गाभारे रिकामेच आहेत तरीही या भव्य दिव्य अशा शिल्पांनी आजही तग धरून ठेवला आहे.
अच्युतरायाच्या मंदिरासमोर थेट समोरील बाजूस मोठ्या अशा परिसरात दगडांचे गाळे (दुकाने) दिसतात. एकाच रेषेत बांधलेले हे गाळे एकाच आकाराचे आणि समांतर अशा रेषेत आहे. पूर्वी या ठिकाणी बाजार भरत असत.
सहज नजरेस न पडणारा पण स्वतःच सौदर्य जपणार अस एक लहानस कुंड बाजाराच्या मागील बाजूस आहे त्याला " पुष्करणी" असे म्हणतात. पुष्करणीची एकंदर रचना आणि आजुबाजुचा परिसर पाहता असे वाटते कि बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांसाठी पुष्करणी म्हणजे आराम करून थकवा घालवण्याचे ठिकाण आहे.
नंतर पुढे आम्ही "हजारा रामा" मंदिराला भेट द्यायला निघालो. नावातच मंदिराचे वैशिष्ठ सामावले आहे. नावाप्रमाणेच या मंदिरात १००० राम कोरले गेले आहेत. या मंदिरातील दगडांवरील कोरीवकाम कौतुकास्पद आहे . मंदिराच्या आतील भागात अनेक ठिकाणी काळ्या दगडाचा वापर केला असून त्यावर रामाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या भिंतीवर रामायण कोरलेले आहेत. या मंदिराची बारकाईने माहिती समजून घेण्यासाठी गाईड ची मदत आवश्यक आहे.
क्षणभर विसावा घेऊन पुढे आम्ही त्या काळाची नगररचना असलेल्या भागात गेलो. या ठिकाणी काळ्या दगडात बांधलेली पुष्करणी म्हणजे गणितीशास्त्र, स्थापत्याशात्र आणि आरोग्यशास्त्र याचा जिवंत नमुना आहें. कुंडामध्ये वाहून आणण्यात आलेल्या पाण्यातील गाळ, माती याचे शास्त्रोक्त पद्धतीने निचरा होऊन शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे अशी कलात्मक रचना म्हणजे हे कुंड - पुष्करणी. हे ठिकाण बर्यापैकी उंचावर असून इथं पर्यंत पाणी वाहून आणण्यासाठी देखील दगडांच्या पाईपचा वापर केला आहे.
पुष्करणीच्या समोरील बाजूस नजरेस पसतो हे म्हणजे " दशहरा डिब्बा ". या परीसातील सर्वात उंच असा दगडी चौथरा (टेबल ). या ठिकाणी दसरा सण साजरा करण्यासाठी प्रजा मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत. या ठिकाणावर उभे राहून पाहिल्यास चारही दिशांमध्ये दूरवर पसरलेले महान " विजयानगर" साम्र्याज्य नजरेस पडते. हा चौथरा घडवताना काळा दगड वापरलेला असून त्यावर अत्यंत सुबक असे हत्ती, घोडे ,सिंह आनंदीत होऊन वाद्य वाजवणारी प्रजा, हत्तीस्वार (माहूत) यासारखे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रसंग कोरलेले आहेत. चौथाऱ्यावर जाण्यासाठी मागील बाजूने तर उतरण्यासाठी पुढील बाजूने पायऱ्या घडवलेल्या आहेत.
या खेरीज राजाचा दरबार,गुप्त ठिकाण (ज्या ठिकाणी महत्वाची बोलणी व्हायची अशी जागा) आणि दंड चौथरा या सारखी ठिकाण देखील आपल्या आठवणीत साठवली जातात. इतकं सार फिरून शरीर जाम थकलं होत पण मन मात्र अजून यासारखीथक्क करणारी ठिकाण पाहण्याकरता उतावळ होत.
हे ठिकाण पाहून पुढे आम्ही "राणीच्या आंघोळीचे स्नान कुंड" पाहायला निघालो. चौकोनी अशी रचना असलेलेल्या या वस्तूला अनेक दालन असून छतावर सुंदर नक्षीदार रंगकाम केलेले आहे. या ठिकाणी जलाशयातून पाणी वाहून आणण्याची सोय केली गेली असून गरम पाणी कुंडात पडावे याची देखील काळजी घेण्यात आली आहे.हम्पी मधील प्रत्येक वास्तुरचना आणि त्याचे वैशिष्ठ आपल्याला थक्क करून टाकत.
या नंतर "झेनन महाल " या ठिकाणी कमल-महाल , हत्तीशाळा हि प्रेक्षणीय देखील पहिली.
हे इतक सगळ फिरून पाहायला (ते ही रिक्षाने ) आम्हाला दुपारचे ३-३० वाजले . जेवणाची वेळ निघून गेली होती त्यामुळे भूख आणखीनच जाणवत होती. आमच्या रिक्षावाल्याने जवळ असलेल्या एका साउथ इंडिअन हॉटेल मध्ये नेलं .हॉटेलचे विशेष म्हणजे त्याचे छत हे झावल्यांपासून बनवले होते आणि टेबल देखील दगडांपासूनच बनवले होते. अश्या या खास ठिकाणी , झाडांच्या थंडाव्यात आम्ही गरम गरम आणि चविष्ठ जेवणाचा आस्वाद घेतला. हॉटेलच्या मागील बाजूसच रान असल्यामुळे अनेक मोर देखील नजरेस पडले. इतक्या जवळून मोर पाहण्याचा माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग! निळ्या, हिरव्या ,मोरपंखी ,काळ्या रंगाच्या असंख्य छटा म्हणजे मोराला लाभलेल वरदानच आहे. बर वाटलं त्या स्वतःत मग्न असलेल्या मोराला मुक्तपणे इकडेतिकडे वावरताना पाहून.
जेवण आणि चालण इतकं झाल होतं की खरोखरच शरीराला आरामाची गरज जाणवत होती. मात्र "विजया विठ्ठल" मंदिराबद्दल जे जे काही ऐकल होत ते ते पाहण्यासाठी मी तर खूपच आतुर झाले होते. मंदिरातील सभा मंडपे आणि त्यांच्या रचनेमागील इतिहास ,शास्त्र समजून घेण्याकरिता इथे मात्र आम्ही गाईडची मदत घेतली. आमच्या गाईडची हिन्दी जरा तोडकी मोडकीच होती पण साउथच्या त्या टिपिकल सुरात हिन्दी ऐकायला मज्जा येत होती. अत्यंत उत्साही अश्या त्या मुलाले आम्हाला मंदिरातील कळसापासून ते शेवटापर्यंत सगळी माहीती अगदी प्रत्याक्षिकासकट दिली. मंदिराच्या बाहेरील बाजूस विस्तृत असा बाजार आहे. मंदिराभोवती चोहोबाजूंनी दगडी तटबंदी देखील आहे
मंदिराच्या मुख्य दरवाज्याने आत जाताच आपल्याला कोणार्कच्या सूर्य मंदिराची कलाकृती दिसते. दगडाचे २७ वेगवेगळे भाग एकमेकांवर आणि एकमेकांत अडकवून बनवलेली ही कलाकृती या मंदिराची शानच आहे. केवळ हे मंदिरच नव्हे तर हम्पी मधील सगळीच मंदिरे हे वाळू चुना यांचा वापर न करता घडवलेली आहेत. आहे न हे आश्चर्य !!
मंदिराच्या पुढील भागात पूर्वीच्या काळी भारतात घोडे विक्रीसाठी येणाऱ्या अनेक परदेशी व्यापार्यांची चित्रे कोरली आहेत. त्यात चीनी, पोर्तुगल, रशियन यासारख्या व्यापार्यांचे चित्रे सहजच ओळखू येतात .
विठ्ठल मंदिरात अनेक मंडप आहेत त्यातील महत्वाचा एक म्हणजे संगीतमंडप. मंडपाच्या प्रत्येक खांबांमधून निघणारे वेगवेगळे वाद्य ध्वनी म्हणजे मोठमोठ्या शास्त्रद्यानांसाठी संशोधनाचा विषय आहे. संगीत-मंडपाचे वर्णन आणि आजही त्यातून निघणाऱ्या आवाजाची प्रात्याक्षिके आमच्या गाईड आम्हाला खुपच सुरेख पद्धतीने दाखवली.
याखेरीज कल्याण-मंडपातील दगडात कोरलेला राम - सीतेचा विवाह सोहळा आणि विवाहासाठी आलेले देव- देवी अत्यंत लक्षनिय आहे.
महा-मंडपातील छतावर मध्यवर्ती भागात कोरलेले फुलांची नक्षी लाजवाब आहे. तसेच चीनी ड्रागेन आणि सिंह यांचे एकत्रितपणे केलेले कोरीव काम देखील मंडपाच्या वास्तूत भर घालतात.
साधारण संपूर्ण मंदिर पाहायला आणि समजून घ्यायला आम्हाला १ तास लागला. मंदिराच्या मागच्या बाजूने बाहेर पडल्यास परत एकदा तुंगभद्रा नदीचे खळखळणारे पात्र दिसते आणि आम्ही जेव्हा मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा सुर्य अस्तालाच जात होता. थंड वाऱ्याच्या आणि मावळत असलेल्या त्या सूर्याच्या सहवासातून बाहेर पडायला नकोस वाटत होत.
हॉटेलवर निघताना तिथे ट्रीपला आलेल्या शाळकरी मुलांसोबत मस्ती करत, गाणी म्हणत आणि अनेक कलाकृतींचे नजारे मनात साठून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
हंपी भाग दोन वाचण्यासाठी इथे क्लिक करा.







Comments
Post a Comment