सह्याद्रीतील एक रत्न - रतनगड


सकाळी ठरल्याप्रमाणे दहा वाजता प्रबोधिनीच्या गेटवर आमची गाडी उभी बघून आता आपण रतनगडच्या प्रवासाला निघणार आहोत याची शाश्वती झाली. काही दिवांपूर्वीच   रतनगडला होणाऱ्या  गर्दीचा फोटो  सोशल मीडियावर  व्हायरल झाला होता.
कारवी ला आलेल्या फुलांमुळे आणि त्या फुलांचा आनंद घेण्यासाठी म्हणून ही गर्दी रतनगडावर होत होती. त्यामुळे आज जाऊ-उद्या जाऊ या विचारांमध्ये रतनगडला जाण्यासाठी अखेर आठवड्यातील सोमवार -मंगळवार हा दिवस निवडला.

आमच्या टीम मधील विश्वराज व्यवहारे ने सर्वांकडून तयारी करून घेतली बॅग तयार झाल्या आणि अखेर आम्ही गाडीत बसलो.
वाटेमध्ये दोनच्या सुमारास आम्ही मजबूत जेवलो.

Bhandardara
भंडारदरा धरणाच्या आजूबाजूचा परिसर



संध्याकाळी वातावरण बदलला. अकोले मध्ये आम्ही आलो होतो. हवेतील गारवा , निसर्गाची मोहकता हिरवीगार झाडी, सोन्यासारखी पिवळी झालेली भात शेती यावरून आपण वेगळ्या विश्वात आलो याची अनुभूती आली. महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाईच्या अभयारण्यामध्ये आम्ही प्रवेश केला होता. साधारण पाचच्या दरम्यान आम्ही भंडारदरा या परिसरामध्ये पोहोचलो होतो. भंडारदरा धरणाच्या आजूबाजूचा परिसर आणि त्या परिसराची भवती पहारा देत उभी असलेली कळसूबाईची शिखराची रांग, कळसुबाई शिखर, अलंगगड,मदनगड,कुलंगगड आणि रतनगड याचे दर्शन एकाच ठिकाणाहून होते. सह्याद्रीच्या या आगळावेगळा परिसरात आणि जलसंपत्ती लाभलेल्या अशा स्वर्गात आम्ही सूर्यास्ताच्या वेळेला जाऊन पोहोचलो. सूर्यकिरणांनी आकाश तांबडे करून सोडले होते. त्यामध्ये ही सर्व किल्ल्यांच्या रांगा अधिकच मोहक वाटत होत्या. 
पिवळे गवत त्या सौंदर्यामध्ये भर घालत होते. आणि पक्षांचा चिव चिवट आमचे स्वागत करत होता. अशा निसर्गाने भारावून टाकलेल्या सायंकाळी आमचा पाय तिथून काही निघत नव्हता. पण भानावर येऊन काहीशा छान आठवणी डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही तिथून निघालो. साडेसातच्या सुमारास आमची गाडी साम्रद या गावी जाऊन थांबली. 

bonfire
 शेकोटीभोवती आम्ही बसलो
वातावरणामध्ये हलकासा गारवा होता. गरमागरम जेवणामुळे त्या गारव्याला आणखी मजा आली. जेवणाच्या आधी आशियातील दुसऱ्या क्रमांकावरील सांदण व्हॅली या ठिकाणी आम्ही शेकोटी पेटवून आमचं बस्तान काही वेळ मांडलं. एकमेकांचे गिर्यारोहणातील अनुभव आणि ओळख यातून गप्पा रंगल्या. गप्पांमुळे आणि ज्या शेकोटीभोवती आम्ही बसलो होतो त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये एक विश्वास निर्माण झाला. सर्व वयोगटातील लोक एकत्र असल्यामुळे प्रत्येकाचे अनुभव, विचार,दृष्टिकोन सर्वच कौतुकास्पद होतं. जेवण करून आम्ही रतनगड ची स्वप्ने बघू लागलो सकाळी सहाला आम्हाला रतनगडाकडे प्रस्थान करायचे होते.

पाच वाजता सगळ्यांच्या मोबाईल मधील गजराने आम्हाला झोपेतून जागा केलं. पटकन उरकून आम्ही झटकन बाहेर पडलो. नाश्ता आणि गरम चहा घेऊन रतनगडाची वाट पकडली. शेताच्या बांधांवरून आम्ही चालू लागलो. 


रतनगड त्यावेळेला फारच उंच दिसत होता. कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराचा तो परिसर. साहजिक आहे रतनगड त्याच रांगेत असल्यामुळे त्याची उंची देखील कळसुबाईच्या आसपासच असणार, आणि चढण्यासाठी तितकाच  आव्हानात्मक. जंगलातून अगदी 100 मीटरचा रस्ता पूर्ण केला आणि चांगली चढण लागली. वातावरणातील थंडता आणि सकाळची ऊर्जा आम्हाला पुढे नेत होती. आठवड्यातील सोमवार असल्यामुळे गर्दी अजिबातच नव्हती. गडाच्या वाटेवर आम्ही काय ते पंधरा सोळा जण गप्पाटप्पा करत फोटो काढत दमत पुढे जात होतो. 
बाणाच्या आकाराचा बाण नावाचा सुळका

साडेआठच्या दरम्यान शिडीच्या वाटेवर पोहोचलो. त्या ठिकाणाहून सांधन व्हॅलीची मागची बाजू अगदी सहज दिसत होती. त्या मागच्या बाजूस अलगदपणे बाणाच्या आकाराचा बाण नावाचा सुळका डोकावत होता. साधारण 970 फुटी असा हा सुळका फारच आकर्षक तितकाच आव्हानात्मक भासत होता. गडावरील एका टप्प्यावर आम्ही पोहोचलो. गडावरील लोखंडी रेलिंग च्या मदतीने आम्ही पुढे पुढे जात राहिलो. गडावर आल्यानंतर कळसुबाई शिखर आणि आजूबाजूचा परिसर आणखीनच मनमोहक वाटत होता आणि त्यात भर पडत होती ते म्हणजे तिथल्या जलाशयाची. जितका मोहक परिसर तितके जास्त कष्ट शरीर अनुभवत होते चढण चांगलीच होती. मात्र निसर्गाची साथ लाभली आणि आम्ही तो चढणीचा भाग अवघ्या काही वेळातच पार केला. पुढील टप्प्यावर आम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या पार करायच्या होत्या. अंगावर येणारा चढ आणि त्यात मोठ्या पायऱ्या हे आवाहन केलं आम्ही किल्ल्यावरील पहिल्या दरवाज्यात पोहोचलो. 

किल्ल्याचा पहिला दरवाजा मोहक वाटला. पुढे पंधरा एक पायऱ्या चढल्यावर एका पठारावर पोहोचलो. जरा वेळ विश्रांती घेतली आणि पहिला टप्पा म्हणजे नैसर्गिक रित्या तयार झालेले रतनगडचे नेढे. ज्याचे आकर्षण सर्वच ट्रेकर्सला असते. आठवड्यातील पहिलाच दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी अजिबात गर्दी नव्हती आणि आम्हाला वैयक्तिक रित्या नेढ्यामध्ये फोटो काढण्याची संधी लाभली.
पहिला टप्पा 

नेढ्यातून खाली डाव्या हाताला उतरून आम्ही तिथे असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या. आकाशातील निळ्या रंगामुळे टाक्यातले पाणी फार सुंदर निर्मळ वाटत होते. त्याच परिसरामध्ये काही जिवंत झऱ्यांचा आनंद देखील आम्ही घेतला. रतनगडावरील पाण्याच्या टाक्यांच्या विस्तारावरून त्या ठिकाणी पाणी कसे वाचवावे, साठवावे याबद्दल दूरदर्शी विचार झालेला दिसून येतो.

रतनगडावरील पाण्याच्या टाक्यांच्या विस्तार
त्याच ठिकाणाहून काही अंतर पुढे जाता कात्राबाईचा डोंगर, अग्निबाण सुळका, आजोबा डोंगर अगदी व्यवस्थितपणे दृष्टिक्षेपात येतात. 
नैसर्गिक रित्या तयार झालेले रतनगडचे नेढे
कडेलोटाच्या समोरील भग्नावस्थेतेतील  बुरुज आजही तिथे तग धरून ताठ मानेने उभा आहे. खिडकी असलेला हा बुरुज येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी एक आकर्षण बिंदू आहे. बुरुजाच्या डाव्या बाजूला चालत जाता गणेश दरवाजा लागतो. गणपतीचे आणि हनुमानाचे शेंदरी रंगात असलेले कोरीव काम त्या काळा कातळातील दगडांमध्ये खुलून दिसते.
कडेलोटाच्या समोरील भग्नावस्थेतेतील  बुरुज

रत्नाई देवीचे मंदिर व पुढील 70 80 लोकांना राहता येईल अशी भव्य गुहा पाहण्यासारखी आहे .
रत्नाई देवीचे मंदिर


भव्य अशा रतनगडास वेढा मारून आणि वर नमूद केलेली सर्व ठिकाणे पाहून अकराच्या दरम्यान आम्ही गड उतार करण्यास सुरुवात केली.

 असा आमचा हा रतनगडाचा ट्रेक मनामध्ये खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही पूर्ण केला

Comments