औरंगाबाद ! ऐतिहासिक शहर !! (क्रमशः)
औरंगाबादमधील दुसर्या दिवशी जरा निवांत उठून आम्ही "देवगिरी" म्हणजेच सध्याचा "दौलताबाद " किल्ला पाहायला निघालो. शहराच्या मध्यवर्ती परिसरापासून १३ किलोमीटर अंतरावरच देवगिरीचा किल्ला आहे. इथे पोहचण्यासाठी रिक्षा आणि बस उपलब्ध आहेत. प्रमुख आणि वाहतुकीच्या रस्त्याला लागुनच असणारा हा किल्ला सहजच आपले लक्ष वेधून घेतो . हा किल्ला यादवांच्या काळात बांधला गेला असून नंतर तो १३२८ च्या कालावधीत मुहम्मद-बिन-तुघलुग या कडे आला.
प्रचंड मोठे बुरुज,किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर, किल्याभोवती असलेला खंदकाचा वेढा ,किल्ल्याची उंची त्यामुळे किल्ला सहजच डोळ्यात भरतो आणि म्हणूनच कि काय हाच किल्ला पुढे १६०७ साली राजधानीचे ठिकाण म्हणून उदयास आला .सैनिकी अभियांत्रिकीचा सखोल अभ्यास आणि उत्कृष्ट नगररचना हेच या किल्याच्या स्थापत्य कलेचे विशेषण आहे.मुख्य प्रवेशद्वाराला "आम खास व्दार " असे म्हटले जाते. किल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराने आत येताच उजव्या आणि डाव्या बाजूला असलेल्या तोफांच्या रांगा आपल्या स्वागतासाठीच थांबल्या आहेत असे वाटते.
लहान-मोठ्या उंचीच्या ,वेगवेगळ्या आकाराच्या, निरनिराळ्या धातूंच्या,काही साध्या तर काहींवर नक्षीकाम असलेल्या अश्या अनेक तोफा आपल्याल्या इथे पहायला मिळतात. हा किल्ला म्हणजे तोफांच संग्रहालायचं आहे असे म्हटले तरी चालेल.
तोफा पाहून पुढे जाताच दोन प्रचंड बुरुज आणि कमान असलेले एक व्दार आपल्या स्वागतासाठी सज्ज दिसते . बुरुजा लगतच्या भिंतींवर असणारे नाजुक असे हत्तींचे शिल्प लोभनीय आहेत. तसेच बुरुजांमध्ये तयार केलेल्या एक सारख्या खिडक्या बुरुजाची शोभा आणखीनच वाढवितात.
मजबूत बांधकाम , विस्तीर्ण असा परिसर\आणि शत्रूला चकवा देणारे असे
स्थापत्यशास्त्र असा हा देवगिरी आजही कुतूहलाचा विषय आहे. किल्याचा मध्यवर्ती असणारा लाल दगडांचा उंच मनोरा आकर्षिक आहे. मनोर्याच्या भोवतालचा परिसर पूर्वी सामान्य लोकांच्या सभांकारिता राखीव असे.
पुढे काहीस अंतर चढून जाताच आपल्याला एक मंदिर लागत.
संपूर्ण भारतात असे दुसरे मंदिर कुठेच सापडणार नाही असे हे "भारत मातेचे मंदिर".मंदिराचा गाभारा लहान असून मंदिरासामोरचे पटांगण भव्य आहे. मंदिराच्या गाभार्यात सर्वाना उभे राहता यावं यासाठी ठराविक अंतरावर दगडी खांब उभारलेले आहेत . शांत आणि पवित्र अश्या या ठिकाणी "भारत मातेचे"दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
किल्ला पाहत जस जस आम्ही पुढे जाऊ लागलो तसतस किल्याच्या रचनेचे रहस्य आणखीनच उलघडत गेले. आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो त्या जागेला "अंधेरी " असे म्हटले जाते. किल्याच्या याच विशेष अंतर्गत रचनेमुळे " देवगिरी " कायमच अभेद्य राहिला. बालेकिल्ल्याकडे जातांना प्रवेशद्वारांचा वेढा असावा अशी काहीशी एक कल्पक योजना करून बांधण्यात आलेला हा वळणावळणाचा बोगदा म्हणजे "अंधेरी" होय.नावाप्रमाणेच हा भाग कायम अंधारातच असतो .
या भागात रस्ता शोधणंच म्हणजे आव्हानात्मकच आहे . बोगद्या मधील वाट लांब असून पायर्यांना चढण आहे. या पायर्यांची रुंदी आणि उंची सुद्धा असमान आणि कठीण आहे. अश्या या ठिकाणी आलेल्या शत्रूचे सैनिक अजब अश्या भूलभूल्यात सापडत. येथील गाईड सांगत अशा सैनिकाकडे परतीचा मार्गे नसायच चा केवळ १च मार्ग असे आणि तो म्हणजे उजेड असणारा एक रस्ता सरळ आम्हत्येसाठी एका खंदकाला जाऊन मिळतो . त्या ठिकाणी सैनिक उडी मारून आपला जीव देत असत. सध्या या रस्त्याला पुढे जाण्यास मनाई असून तो बंद केला आहे. असा हा अनेक अडथळे असलेला अंधेरीचा भाग किल्याच्य अभेद्य रचनेचा पाया आणि रहस्य आहे.
अशा या अंधातून पुढे जाताच आपण पोहचतो ते म्हणजे "चीनी महालात ".बर्यापैकी उंचावर असणाऱ्या या महालात राजाचे वास्तव्य असायचे. चीनी महाल किल्याच्या मध्ये आणि उंचावर असल्यामुळे संपुर्ण किल्ला आणि सभोवातल्या परिसराचे निरीक्षण करणे सहज -जायचे .
चीनी महाला लागतच पुढे आहे तो म्हणजे "रंग महल". किल्यावरील सर्वात मोठा असा हा महाल खास कार्यक्रमासाठी वापरला जात. सध्या रंग महल भग्न अवस्थेत असून पाहण्याजोगा आहे
सुरुवातीलाच नमूद केल्या प्रमाणे हा किल्ला खास करून तोफांसाठी प्रसिद्ध आहे. इथे असणारी "मेंढा तोफ" हि त्यातीलच एक खास तोफ असून विलक्षण अशा कलेचा नमुना देखील आहे. भारतामधील सर्वात जुन्या तोफांमधील हि एक तोफ असून त्यावरील धातुकाम उच्च प्रतीचे आहे.
ही तोफ मुहम्मद हुसैन अरब यांनी घडवली असून इतिहासकार असे मानतात कि ही तोफ औरंगजेब राजाच्या ताब्यात असल्या पासून त्याचवरचे नाव एक चिन्ह म्हणून कोरलेले गेलेले आहे. तोफेवर लिहलेले वाक्य अशा प्रकारे आहे - अबुल जफर मुहीद्दिन मुहम्मद औरंगजेब बहादूर , अलामगिरी बादशाह गाझी '. असे समजले जाते कि ही तोफ एक भेटीच्या स्वरुपात या किल्यावर आहे. मेंढ्याचे तोंड , त्याची शिंगे,त्यावरील कोरीव नक्षी , तोफेसाठी वापरात आलेले धातू , तोफेची उंची, ,वजन यावर चर्चा करावी तेवढी थोडीच आहे. विशेष म्हणजे अनेक उन्ह,थंडी ,वारा , पाऊस सोसणारी हि तोफ आजही ही तोफ उत्कृष्ट अवस्थेत आहे.
किल्याच्या खालच्या बाजूस उतरताना जराश्या आड वाटेला आपल्याला एक गणपतीचे मंदिर लागते . हे मंदिर आजही जागृत असून गणेशाची ठेंगणी मूर्ती विलोभनीय आहे . अत्यंत साधे पण प्रसन्न असे गणपतीचे हे लोभस रूप पाहून सर्व क्षीण नाहीसा होतो.
काही वेळ मंदिरालगतच्या कट्ट्यावर आम्ही विश्रांती घेऊन पुन्हा परतीच्या मार्गाकडे निघालो.
प्रचंड सामर्थ्य असलेला हा ऐतिहासिक नमुना महाराष्ट्राच्या भूमीवर आजही धीर गंभीरपणे इतिहाची साक्ष देत उभा आहे.जमलच तर आपल्या "देवगिरीला" आणि नंतरच्या "दौलताबाद" किल्याला आवश्यक भेट द्या हि विनंती.


wow once again Great narration of best place !!!
ReplyDelete