हम्पी....वास्तुकलेचे साम्राज्य .. भाग २

हम्पी....वास्तुकलेचे साम्राज्य .. भाग १ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणांना एकाच दिवशी भेट देता आली नाही तर दोन दिवसात आरामात हो सगळी ठिकाण बघून होतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही बदामी,अहीहोले  आणि पत्तडकलकडे निघालो. हम्पी  पासून १५० किलोमीटर च्या अंतरावर असलेले बदामी हे ठिकाण तिथल्या कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. सर्व सामान्य
जीवनशैली  पाहता यावी म्हणून आम्ही बसने प्रवास करायच ठरवलं. २-३ ठिकाणी बस बदलून आम्हाला बदामीला पोहचण्यासाठी साधारण ३ तास लागले . त्यानिमित्ताने अनेक लहान लहान खेड्याना भेटी (बसमधून) देण्याचा योग आला . हम्पी ते बदामी बसेस उपलब्ध आहेतच पण कार  घेऊन जाणे जास्त सोईस्कर पडले असते अस नंतर आम्हाला (खूप दमछाक ) जाणवलं .  बदामी,अहीहोले  आणि पत्तडकल या एका दिवसाच्या ट्रीपसाठी ३५००-४००० रुपये कारभाडे आकारण्यात येते.बदामीला राहण्यासाठी फारच कमी पर्याय आहेत त्यामुळे सगळेजण हम्पी वरूनच बदामीला येतात.

सगळ्यात आधी आम्ही हंपी वरून  बदामीला  पोहचलो. बस स्टॅन्ड पासून १- १. ३० किमी  अंतरावर बदामीच्या गुहा आहेत . रस्त्यातच डाव्या हाताला डोंगरावर आपल्याला शंकराचे अत्यंत सुबकरित्या कोरलेले मंदिर दिसते.बदामी च्या गुहांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक रस्ते आहेत.



आम्ही मात्र बाजारपेठेतून जायचे ठरवल. बदामीची बाजारपेठ  लहान-मोठ्यांच्या रंगीबेरंगी कपड्याने , लाल - गुलाबी फेट्यानी , चकचकणाऱ्या तांब्या - पितळ्यांच्या भांड्यांनी सजली होती. त्यामुळे ग्राहकांची गर्दी देखील
भरपूर होती. तरी मात्र लेण्याजवळ कधी पोहचणार असा वाटत होता. बाजारपेठेतील कुठल्याही रस्त्यावरून समोरील डोंगरात पाहता या गुहा सहज दिसतात. 


मजल दरमजल करत आम्ही या ठिकाणी पोहचलो . गुहेच्या पायथ्याशीच पार्किगची व्यवस्थित  सोय आहे.  तिकिट घेऊन आम्ही बदामीच्या लेण्या पाहण्यासाठी सज्ज झालो.या सर्व गुहा लाल दगडात कोरल्या असून कोरीवकाम अजूनही जिवंत आणि सुबक आहे. या गुहांची खासियत म्हणजे बाहेरून या गुहा ठेंगण्या दिसतात मात्र आतमध्ये गेल्यावर त्यांची खरी उंची समजते. प्रत्येक गुहेच्या बाहेरील खांबांवर सुन्दर असे नक्षीकाम केले आहे. या गुहा हिंदू शैलीमध्ये कोऱ्या असून रामायणातील अनेक प्रसंग इथे पाहायला मिळतात.  बदामीच्या गुहा म्हणजे अजिंठा लेण्यांची लहान प्रतिकृतीच आहे. उंच डोंगरावर  असलेल्या या बदामीच्या ७-८ गुहा आकाराने लहान मात्र सुबक आहेत. गुहांमधील कोरीवकाम , खांबांवरील प्राणी ,पक्षी, फुल यांची नक्षी कौतुकास्पद आहे . इथे कोरण्यात आलेले देवी देवतांचे पौराणिक प्रसंग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आजही जिवंत वाटतात. 

गुहांच्या समोरील बाजूसच आपल्याला एक मोठा तलाव दिसतो आणि त्याच्या जवळच दिसते ते म्हणजे भुतनाथाचे मंदिर. अत्यंत मोठे आणि लोभस कलाकुसर असलेले हे भुतनाथाचे  मंदिर त्याला लाभलेल्या तळ्यामुळे खूपच आकर्षित दिसते. एखाद्या दिवशी पाण्यात पाय घालून, थंड हवेची झुळूक अंगावर घेत संध्याकाळ चे काही क्षण अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत घालवावे अशी हि जागा. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला उंच डोंगर, मंदिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब, मंदिराच्या भोवताली असलेली हिरवळ यामुळे हि जागा फोटोग्राफर आणि चित्रकार यासाठी पर्वणीच आहे.
मंदिर आणि बदामी गुहा पाहून आम्ही पुन्हा बस स्टॅन्ड जवळ आलो. दुपार झाली होती म्हणून जेवण करूनच पुढे अहीहोळे आणि पत्तडकलकडे जायचे ठरवलं. बदामीला बस स्टॅन्डजवळ जेवणासाठी २-३ हॉटेल आहेत. आम्ही तिथेच जेवण करून घेतल. बदामी ते पत्तडकल १७ किलोमीटर आणि पत्तडकल ते अहीहोळे २३ किलोमीटर असा अजून आमचा ४०-४२ किलोमीटरचा प्रवास बाकी होता. बस स्टँडच्या बाहेर असलेल्या रिक्षावाल्याशी काही वेळ हुज्जत घालून पत्तडकल आणि अहीहोळे साठी आम्ही त्याला ७०० रुपयात पटवलं.(१२०० रुपयांनी सुरुवात झाली होती).


लहान रस्ते असलेल्या खेड्यांमधून आमची रिक्षा बुंगाट चालली होती. रोडवर अजिबात वाहन नाही, थंडगार हवा , सगळीकडे उसाच्या, केळ्याच्या बागा आणि आम्ही यामुळे या रिक्षेच्या प्रवासाला काही वेगळीच मज्जा  येत होती .  आम्हाला बोअर होऊ नये म्हणून रिक्षावाला देखील जुन्या हिंदी गाण्यांची कॅसेट मोठ्या आवाजात बडवत होता. या सगळ्यामुळे बदामी ते  पत्तडकल १७-१८ किलोमीटरचे अंतर कसे पार केले गेले हे समजलंच नाही.
अनेक लहान मोठ्या कोरीव अश्या मंदिराचा समूह म्हणजे "पत्तडकल".

मंदिरांचा असा हा भव्य समूह पाहून थक्कच व्हायला होत. या मंदिरांच्या गाभाऱ्यात मुर्त्या नसल्याकारणामुळे ती भग्नावस्थेत आहेत मात्र मंदिरांची स्थिती, त्यावरील कोरीवकाम आजही उत्तम आहे. हि मंदिरे प्रचंड मोठी असून भक्कम आहेत. मंदिरांमधील खांबांवर नाजूक नक्षीकाम दिसते . अनेक प्राणी आणि विष्णू,शंकर, राम  यांच्या जीवनावर आधारित अश्या अनेक पौराणिक कथा कोरल्या आहेत. या कोरीवकामाची दाद जेवढी द्यावी तेवढी कमीच आहे कारण इतके वर्ष लोटली तरी त्यातील प्रसन्नता, भाव आजही जागृत आहेत.


इतक्या मंदिरांमध्ये एकमेव शंकराचे मंदिर आहे जिथे आजही पूजा होते. मंदिराच्या गाभाऱ्यात अंधार असून सतत तेवणार्या वातीमुळे मंदिराची प्रसन्नता टिकून आहे . या मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेला नंदी आपला लक्ष वेधून घेतो. एकाच अखंड गुळगुळीत पाषाणात कोरलेला हा नंदी भारतीय कलाकृतीचा नमुनाच आहे. या ठिकाणी जेवणासाठी  हॉटेल ची सोय नाही.  मात्र मंदिराच्या बाहेरील बाजूसच काही ग्रामीण महिला बाजरी,ज्वारीची भाकरी , भाजी , दही आणि चटकदार ठेचा  घेऊन बसलेल्या दिसतात आणि ते हि फक्त २०-२५ रुपयात. आम्ही देखील या लज्जतदार जेवणाचा आस्वाद घेतला आणि पुढे अहीहोळेकडे निघालो

अहीहोळेला जाण्यासाठी आम्हाला जरा जास्त वेळ लागला.  सूर्य देखील अस्ताला  चालला होता. अगदी मंदिर  बंद होण्याच्या ४५ मिनिटे आधी म्हणजे ५. १५ ला आम्ही या ठिकाणी पोहचलो. पटकन गाईड घेतला आणि मंदिर पाहायला सूरूवात केली . भारताच्या पार्लमेंट सारखी कलाकृती असलेलं  मंदिर हेच अहीहोळेच खास आकर्षण आहे.  भारदस्त अशी हि कलाकृती लाल खडकात कोरली असून आतील बाजूस देवी, देवतांच्या पौराणिक कथा आणि सुबक नक्षीकाम आहे .

अहीहोळे म्हणजे जुन्या काळातील स्थापत्यशाश्त्राची शाळाच होय. त्यामुळे इथे असलेल्या मंदिरांच्या नक्षीकामामध्ये विविधता दिसते . एकाच मंदिरांच्या अनेक  खिडक्या वेगवेगळ्या नक्षीकामने कोरलेल्या आहेत. काही मंदिरे अर्धवट असून त्यांची रचना  रोमन पद्धतीची दिसते . इथे कोरलेल्या
खांबांवरील नक्षीकामावरून आपल्याला सहज कल्पना कि हे विध्यार्थ्यानी केलेले काम आहे म्हणून. थकून भागून आणि थक्क होऊन आम्ही या मंदिराच्या बाहेर आलो.  जवळच असलेल्या टपरीवर चहाचा झुरका मारून थकवा घालवण्याचा प्रयत्न करत होतो.

हे सगळं पाहून भारतातील कला आणि संस्कृतीचा अभिमानच वाटतो. हे सगळं जातं झाला नसतं तर आपल्याल्याला भारतीय कलांमधील विविधतेचि जाणीव देखील झाली नसती.
पुढे म्हणजे तिसऱ्या दिवशी भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी हम्पी....वास्तुकलेचे साम्राज्य .. भाग 3 नक्की वाचा.

Comments