हम्पी....वास्तुकलेचे साम्राज्य .. भाग 3
हंपीमधील आजचा दिवस मात्र अगदी आरामात घालवायच ठरवलं. कारण आदल्या दिवशीचा थकवा अजूनही जाणवतच होता. त्यामुळे निवांत उठून, नास्ता करून आम्ही पुन्हा हम्पी कडे निघालो. आज नदीच्या पलीकडील अंजनामाता मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहायच ठरल. नदीच्या पलीकडे जाण्याकरता आम्ही विरुपक्ष मंदिराच्या मागच्या बाजूला आलो. तिथे नदी पार करण्यासाठी बोटींची सोय दिसताच होती आणि त्यांच्या फेऱ्या देखील मिनिटामिनिटाला असून एकाला १० रुपये तिकीट होत. "कोरॅकल" हे तिथल खास आकर्षण. कोरॅकल म्हणजे वेताची गोलाकार अशी लहानशी होडी. क्षणाचाही विलंब न करता आम्ही कोरॅकल ने जायचं ठरवलं. कारण असा योग परत कधी येईल माहित नाही. काही क्षण का होईना पण मला "दिल है छोटासा" या गाण्यातील मधू झाल्याचा भास झाला.
नदीच्या तीरांवरील हे लहानसं अंतर कोरॅकलने पार करण्याचा अनुभव काहीसा मजेशीरच होता. गोल गोल हेलकावे घेत आम्ही तीरावर पोहचलो. नदीचा पलीकडचा परिसर काहीसा "हिप्पी" लोकांच्या वस्तीसारखा वाटतो, वरवर पाहिले तर काहीसा गोव्यासारखा देखील वाटतो. परदेशी पाहुण्याची हि आवडती जागा असल्यामुळे हुक्का, धातूच्या विविध वस्तू, कपडे, रंगीबेरंगी माळां आणि चपलांच्या अनेक दुकानांनी गल्लीबोळ सजलेली दिसत होती.
या भागात राहण्याची सोय अत्यंत उत्तम होऊ शकते कारण इथे अगदी २०० रुपयांपासून रूम भाड्याने मिळतात. तसेच जवळपास फिरण्यासाठी सर्व प्रकारच्या दुचाकी गाड्या देखील अगदी ३०० ~ ५०० रुपयांमध्ये अगदी सहजच उपलब्ध होतात. आम्हीपण त्या दिवशी मोपेड गाडी भाड्याने घेऊन मनसोक्त भटकायचं ठरवलं आणि गाडी ठरवून त्या दिवसाला सुरुवात केली.
हम्पी मधले रस्ते लहान पण नीट असल्यामुळे मोपेडचा प्रवासदेखील आरामदायी वाटत होता. शांत रस्ते, प्रदूषणरहित हवा आणि त्या मोकळ्या रस्त्यावर फक्त आपली गाडी वाह ! या सारखं अनुभव तो काय? मला वाटतं पुणे - हम्पी या रोडट्रीपसाठी उत्तम पर्याय आहे.
वळणावळणाचे रस्ते, सावली देणारी झाडी, दूरवर पसरलेले दगडांचे डोंगर, आणि सोबत वाहणारे नदीचे पाणी यामुळे आपल्याला गाडी चालवायला कंटाळा येणार नाही हे नक्की. वाटेतच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मंदिरांची, नदीच्या पुलाची पडकी झडकी अवशेष देखील या परिसराच्या सौंदर्यात भर घालत होती.
३-४ किलोमीटरच्या अंतरावरच आम्हाला डाव्या बाजूला अंजनी माता मंदिराची कमान लागली. उंच डोंगरात वसलेले हे मारुतीचे जन्मस्थान रस्त्यावरूनच लक्ष वेधून घेतं होतं. पायथ्या पासून हे मंदिर चौकोनी खोली प्रमाणे दिसत होतं. उंचावर दिसणाऱ्या अश्या या मंदिराचा कळस आकाशाला भिडत होता आणि त्यात उठून दिसत होता तो म्हणजे कळसावरचा भगवा झेंडा. हे मंदिर अतिशय साधे असून शुभ्र पांढऱ्या रंगात रंगीविलेले आहे. त्यातच मंदिराच्या कळसावर फडकणारा भगवा झेंडा खूपच शोभून दिसत होता.
या मंदिराच्या लहान-मोठ्या साधारण ७५०च्या आसपास पायऱ्या चढून जाणं म्हणजे दिव्यच होतं. एका ठिकाणच्या पायऱ्या तर मोठा दगड पोखरून बनवल्या आहेत. पर्यटकांसाठी अशी वाट घडवणं देखील कौतुकास्पद आहे .
वर चढत जाताजाता जेव्हा आम्ही आजूबाजूला नजर टाकली तेव्हा पूर्ण हंपी दृष्टीस पडत होतं. उंचावरून दिसणारी नारळ, सुपारीची उंच झाडं, केळीच्या बागा, वेड्यावाकड्या दगडांचे डोंगर, संथ गतीने वाहणारी नदी आणि थकवा दूर करणारी थंड हवा या सगळ्यांच्या सोबतीने आम्ही मंदिराच्या परिसरात कधी प्रवेश केला हे समजलच नाही.
मंदिरात जरा वेळ विसावा घेऊन आम्ही थंड पाण्याने हात पाय धुतले. वाहणारा थंड वारा शरीरावरचा घाम टिपत होता आणि आम्हाला उत्साहीत देखील करत होता. मंदिराचा गाभारा अतिशय स्वच्छ होता. जाड विटांच्या भक्कम भिंती, त्यावर साधा पांढरा रंग, पत्र्याचं छत, उदबत्तीचा सुवास आणि मारुतीची प्रसन्न दगडातील मुद्रा यामुळे त्या लहानश्या खोलीला देखील कमालीचं पावित्र्य आलं होतं.
जरासा आराम करून आणि दर्शन घेऊन आम्ही जय हनुमान ! जय श्री राम ! अश्या घोषणा देत खाली उतरलो. खाली उतरून पायथ्याशी असलेल्या रसवंतीत उसाचा ताजा रस आणि थंडगार नारळ पाणी घेऊन परतीच्या वाटेला लागलो. याच रस्त्यावर पुढे मातंग पर्वत आणि देवीचे मंदिर देखील पाहण्याजोगे आहे. यापर्वतावरून दिसणारा सूर्यास्त पाहण्याची संधी अलौकिक आहे. वेळेअभावी आम्ही ते पाहू नाही शकलो पण तुम्ही हि अशी संधी घालवू नका.
हंपी म्हणजे वास्तुशात्र, इतिहास आणि कलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. ३-४ महिने राहून देखील मन भरणार नाही अस हे ठिकाण! जर तुमच्याकडे वेळ आणि आवड असेल तर पुढे नमूद केलेली आणखी काही ठिकण देखील जरूर पहा.
१. दुर्गा फोर्ट टेम्पल
२. गव्हर्नमेंट हँडीक्राफ्ट बाजार
३. मातंग पर्वत
४. कन्नडा युनिव्हर्सिटी कॅम्पस
५. हम्पी पुरातत्व संग्रहालय
६. हेमतुक गुहा
७. मोरी पर्वत



Comments
Post a Comment