देवकुंड धबधबा !!!निसर्गाचं वरदान
देवकुंड! नावाप्रमाणेच असलेले हे ठिकाण ट्रेकर्ससाठी वरदानच आहे."कुंडलिका" नदीचे उगम स्थान म्हणून देखील या ठिकाणाचं नावलौकिक आहे. मागच्याच आठवड्यात मला इथे जाण्याचा योग आला. "स्नेहल", देवकुंडला जायचं का म्हणून एका मित्राने मला फोन केला आणि क्षणाचाही विलंब न करता मी हो म्हणाले.
पाउस थांबला कि इथे जाण्याचा रस्ता खुला होतो. इथे भेट देण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सप्टेंबर ते जानेवारी. पावसानंतर तर येथील निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडते त्यामुळे चालण्याचा प्रवास (१८ किलोमीटर येऊन- जाऊन) कंटाळवाणा वाटत नाही. या काळात इथलं वातावरण देखील थंडगार, हिरवागार आणि अल्हादायी असत.
पुण्याकडून आलात तर इथे पोहचण्यासाठी ताम्हाणी घाट उतरावा लागतो. त्यांनतर भिरा गाव लागत. तिथेच भिरा नावच धरण आहे.
धरणालागूनच वरच्या बाजूने देवकुंडाकडे जाण्याचा रस्ता आहे. "देवकुंड" हे ठिकाण भिरा धरणापासून साधारण ९ किलोमीटर (२ - २. ३० तास) लांब आहे. संपूर्ण ट्रेक करून परतायला साधारण ५--६ तास लागतात. धरणाच्या उजव्या बाजूला "देवकुंड" तर डाव्या बाजूला "अंधारबन" हा १७ किलोमीटरचा जंगल ट्रेक आहे . २ दिवसाचे नीट प्रयोजन केले तर दोनही ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
आम्ही भिरा गावातील "शेलारमामा" यांच्या हॉटेलवर थांबलो. त्यांच्याकडे उत्कृष्ट अशी राहण्या, खाण्याची सोय झाली.मामांच्या हॉटेलवर गरम पोहे आणि चहा घेऊन आम्ही देवकुंडाकडे निघालो.
जंगलात वाट चुकणे, पाण्यात बुडणे यासारख्या अनेक अपघातात असंख्य तरुणांनी आपले प्राण गमावले म्हणून इथल्या ग्रामस्थांनी जाताना गाईड सॊबत नेणे बंधनकारक केले आहे. धरणापासून देवकुंडापर्यंत जाण्यासाठी गाईड घ्यावाच लागतो (एकासाठी ५० रुपये) .
आमच्यासोबत देखील अत्यंत काटक आणि बडबडे असे प्रकाश काका होते. जाता -जाता अनेक बरे- वाईट प्रसंग फार आत्मीयतेने सांगत होते. जस कुंडामध्ये दोरीच्या पुढे जाऊ नये अस गाईड सांगतात आणि तिथे तशी सूचना पाटी पण लावली आहे तरीदेखील शिकलेली लोक का ऐकत नाहीत हा त्यांचा मोठ्ठा आणि अनुत्तरित प्रश्न होता. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते कि निसर्गापुढे माणसाचं काहीही चालत नाही.
वाटेतील लहान लहान टपऱ्यावर लिंबू पाणी, कोकम सरबत,वडापाव,मॅग्गी याची मज्जा घेत आणि निसर्ग सौंदर्य पाहत आम्ही देवकुंडाच्या जवळ जात होतो .
गप्पा, गोष्टी फोटो काढत आम्ही शेवटच्या टप्प्याला पोहचलो ( शेवटचे २०-२५ मिनिटं) जो रस्ता बऱ्यापैकी अवघड होता आणि जास्त चढणीचा देखील. शरीर पूर्णपणे घामाने भिजल होत आणि चढणीमुळे दम पण लागला होता मात्र धबधब्याच्या पाण्याचा आणि लोकांच्या जल्लोषाचा आवाजाने एक वेगळाच हुरूप चढला. देवकुंडाच्या दिशेने पावलं आणखीनच जोरात पडू लागली.मात्र नंतरचा पुढचा रस्ता हा नदीपत्रातून असल्याने आलेल्या गतीला आवर घालावा लागला.नदीपत्रातील दगड,धोंडे पार करत आम्ही देवकुंडाकडे पोहचलो.
समोर बघताचक्षणी नजरेस पडतो तो " देवकुंडचा धबधबा "! निळ्याशार,स्वच्छ पाण्यानी ओथंबुन वाहणारे असे ते कुंड आणि त्यात खडकातून येऊन उंचावरून पडणारी पाण्याची एकच शुभ्र धार आपल्याला आपल्या अस्तिस्त्वाचं भानच विसरायला लावते.
माझ अंग घामाने डबडबल होतं पण निसर्गाची हि किमया पाहून पाण्यात न भिजताच अंग शहारून गेलं. आम्ही आमच सामान पटापट ठेऊन त्या थंड आणि स्वछ अश्या पाण्यात (मिनरल वॉटरमध्ये😉 ) मनसोक्त डुबक्या मारल्या. पाणी इतक थंड होतं कि डुबकी मारून वर आल्यावर नखशीकांत झिणझिण्याच आल्या.या धबधब्याची खासियत म्हणजे याला बारमाही पाणी असतं.
१ तास मस्त पाण्यात डुबक्या मारून आणि भरपूर फोटो काढून आम्ही ताजेतवाने झालो. दुपारचे ३ वाजले होते आणि परतीची वाट खुणावत होती .
इथलं जंगल अत्यंत घनदाट असून अनेक जंगली प्राण्यांचा इथे वावर असतो त्यामुळे संध्याकाळच्या आत परतणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. सकाळी साधारण ११ वाजता ट्रेक चालू केला तरी ४-५ पर्यंत आपण सहज परत येऊ शकतो, त्यामुळे पुणेकर १ दिवसाच्या पिकनिसाठी देखील या निसर्गरम्य ठिकाणाची निवड करू शकता.
कसे जाल - पुण्यापासून १००-११० किलोमीटर भिरा गाव -->भिरा धरण. स्वतःच वाहन असेल तर उत्तम.
पुण्यापासून लागणारा वेळ - ४ तास (भिरा पर्यंत)
भिरा ते देवकुंड ट्रेक - ५-६ तास
जेवणाची/ राहण्याची सोय - अर्थात " शेलारमामा" यांच हॉटेल. शाकाहारी मांसाहारी जेवणाची उत्तम सोय.घरगुती पद्धतीचे जेवण. १५०-१८०/- ताट. राहण्याची, अंघोळीची सोय ५०० रुपये १ दिवसासाठी.
हवेतील आद्रतेमुळे (humidity) संपूर्ण ट्रेकमध्ये शरीरात ३-४ लिटर पाणी जाणं गरजेचं आहे अन्यथा दुसऱ्या दिवशी खूप थकवा येऊ शकतो.
गाईड - प्रकाश ७०६६९९७४४३ ,
पार्किंग सोय आहे.













Comments
Post a Comment