बेबीमून बजेट डेस्टिनेशन्स - भाग २

नमस्कार वाचकांनो,

पुण्याजवळील बेबीमून डेस्टिनेशन भाग १ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. बेबीमून डेस्टिनेशन भाग १ मधील सगळे डेस्टिनेशन्स जरा हटके असल्यामुळे महाग होती पण मैत्रिणींनो ही सगळी लोकेशन्स महाग असली तरी "value for  money" आहेत बर का. 

आता भाग २ सादर करत आहे खास तुमच्याचसाठी! हि सगळी ठिकाण अगदी आपल्या बजेट मधली आहेत आणि हि देखील अगदी पुण्याजवळच आहेत बर का. मला खात्री आहे कि खाली दिलेल्या ठिकाणांची माहिती आणि वैशिष्टये वाचून अगदी one day return चा का होईना तुम्ही प्लॅन नक्की कराल.



 एकदम बजेट डेस्टिनेशन्स - ४०००-७००० / दिवस 

१. गिरीवन -

डोंगराच्या कुशीत, उंच माथ्यावर वसलेलं गिरीवन म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणीच आहे. इथली खासियत म्हणजे इथे छोटासा टुमदार बंगला २५००-३००० च्या रेंजमध्ये उपलब्ध आहे किंवा बंगल्यातील एखादी  रूम देखील ५००-७५० पर्यंत मिळते.अर्थात ऍडव्हान्स बुकिंग करणे गरजेचे आहे. 

गिरीवन म्हणजे शहरापासून दूर डोंगरावर मस्तपैकी २-३ दिवस अगदी कमीत कमी खर्चात राहता येईल असं उत्तम डेस्टिनेशन आहे. संपूर्ण गिरीवंन  हे डोंगरात असल्यामुळे आपल्या सोईनुसार व्हॅली साईड फेसिंग, फॉरेस्ट साईड फेसिंग या सारखे  रूम सिलेक्शनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 


इथे पर्यटकांसाठी ऍक्टिव्हिटी सेंटर आणि रेनडान्सची खास सोय देखील आहे. जर तुम्ही ८-१० जणांचा ग्रुप  घेऊन गेलात तर प्रेजेन्सी मध्ये देखील तुम्ही  इथे धिंगाणा घाल्याशिवाय राहणार नाही.   



आजुबाचा परिसर हा जंगलासारखाच आहे त्यामुळे पहाटे किंवा संध्याकाळी इथल्या रानावनांतून रमत गमत, पक्षांचे विविध आवाज ऐकत जोडीदारासोबत आरामात १-२ तास भटकू शकता,निसर्ग न्याहाळू शकता. प्रेग्नेंसी मध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपलं मन खरंच खूप शांत होत. अर्थात याचा कळत- नकळत परिणाम आपल्या गर्भावर देखील होतंच असतो.त्यामुळे फिरा,मज्जा करा आणि प्रसन्न रहा.  

२.  ढेपे वाडा -



पौड फाट्या पासून काही अंतरावर असलेला ढेपे वाडा (गिरीवंन  मधेच आहे ) म्हणजे बेबीमून साठी एक उत्तम पारंपारिक ठिकाण आहे अस  म्हणता येईल. काय आहे ना  मैत्रिणींनो, पूर्वी आपलं पुणे वाड्यांसाठीच प्रसिद्ध होतं मात्र सध्याच्या घडीला "शनिवारवाडा आणि ढेपे वाडाच" काय ते लोकांना माहित आहे.जर तुम्ही हौशी असाल म्हणजे नटण - थटणं तुम्हाला आवडत असेल तर हे ढेपे वाडा तुमच्या बेबीमूनसाठी योग्य पर्याय आहे यात काही शंकाच नाही.
अता ते नेमकं कसं ?  तर....  इथे तुम्ही मस्तपैकी नववारी साडी, नाकात नथ,आंबाडा ,त्यात गजरा आणि इतर आपले मराठमोळे दागिने घालून सुंदर अश्या  मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत काही वेळ का होईना वाड्याच्या "प्रेग्नेंट पाटलीणबाई" म्ह्णून स्वतःचे लाड करून घेऊ शकता, मस्त मिरवू शकता.



तसं बघायला गेलं तर बेबीमूनचे फोटोशूट बऱ्याचदा आपण फ्रॉक किंवा गाऊनमध्ये करतोच, पण या व्यतिरिक्त आपल्या पारंपारिक वेशभूषेत देखील फोटो काढायचे असतील तर ढेपे वाडा अगदी साजेस असं ठिकाण आहे. त्याचप्रमाणे तुमच्या परिवारासोबत या वाड्यात डोहाळे जेवणाचा समारंभ देखील मोठ्या आनंदनात साजरा करू शकता.
सध्याच्या काळात दुर्मिळ होत चालेल्या काही जुन्या काळातील वस्तू उदारणार्थ - दगडाचं जातं , उखळ,विहिरीवरच मोट, तांब्या- पितळ्याची भांडी, तुळशीचं वृंदावन आणि अजून बरंच काही ढेपे वाड्या पाहावयास मिळतात आणि त्या खूपच प्रेमानी जपून देखील ठेवल्या गेल्या आहेत. 
तुमच्या बेबीमूनच्या फोटोशूट मध्ये या वस्तू ,तांब्या पितळेची भांडी, तुळशीचं वृंदावन एक वेगळेपण आणण्यास नक्कीच मदत करेल असं मला वाटत.



मोठ्या रूम्स आणि आपलं मराठमोळ जेवण हे इथल वैशिठ्य.संपूर्ण फॅमिली देखील इथे मस्तपैकी एन्जॉय करू शकते असा हा आपलाच ढेपे वाडा. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा ढेपे वाडा

३. जाधव गड --

"राजेशाही स्वागत" म्हणजे काय ? आणि ते नेमकं असतं तरी कसं ? .. … हे आपण एखाद्या मालिकेत किंवा बाजीराव मस्तानी या सारख्या ऐतिहासिक चित्रपटातुन आपण पहात आलेलो आहोत. मात्र जर हे स्वतःच्या बाबतीत अनुभवायचं असेल आणि ही इमॅजिनशेन जीवनांत देखील अनुभवायची असेल तर "जाधव गडाला " जा अस मी आवर्जून सांगेल.
कल्पना करा...  तुतारी,ढोल आणि ताशाचा दणदणीत असा गजर चालू आहे ... प्रवेशद्वारातच लाल नववारी साडी घातलेली एक सुंदर मुलगी तुम्हाला ओवाळते आहे ...  तुम्ही मुख्य द्वाराने आत आला आहात ... रेड कार्पेट वरून तुम्ही चालत आहात ... फुलाचा वर्षाव तुमच्यावर होत आहे...  मागे पुढे असलेले शिपाई तुम्हाला पुढे पुढे घेऊन चालेले आहेत आणि अजूनही तुमच्या कानावर तोच धडाकेबाज आवाज घुमत आहे… तुम्ही स्वागत कक्षापर्यंत जात आहात ... तुमच्या जोडीदाराचा हातात हात घालून अगदी राजा राणीप्रमाणे आणि सगळे तुम्हाला मुजरा करत आहेत ... राजा राणीप्रमाणेच!!!  हॅलोSSSSSS ... गडावरच  पोहचलात कि काय? हो पण खरं अगदी अशाच पद्धतीने आणि अगदी अशाच थाटामाटात आपलं "जाधव गडावर" स्वागत होत बर का एकदम धडाकेबाज …



उन्हाळा असो,हिवाळा असो किंवा पावसाळा .. हि वास्तू अशाच पद्धतीने आपले स्वागत करण्यास सज्ज असते. आणि हि सुंदर आणि टोलेजंग वास्तू ... वास्तू  काय किल्लाच आहे हा आणि ते पण पुण्यातील हडपसर-सासवड मार्गावर म्हणजे पुण्यापासून फक्त १. तासांच्या अंतरावर .. इथे या ठिकाणी राहण्यासाठी रूम्स आणि टेन्ट्स (तंबू) हे दोनही पर्याय उपलब्ध आहेत. २ दिवस राहण्याचा प्लॅन असेल तर एक दिवस तंबू आणि एक दिवस रूमचा आनंद घेऊ शकता.  



उत्तम जेवण आणि भरपूर मोठा परिसर असल्यामुळे बोअर हा शब्द आपल्याला आठवत नाही. जबरदस्त मोठे असे लँडस्केपिंग असल्यामुळे फोटोशूट साठी खूप वाव आहे. या ठिकाणी देखील नववारी साडी आणि इतर वेगवेगळ्या रॉयल लुक मध्ये प्रेग्नेंसी फोटोशूट करून घेऊ शकता. अगदी राहायला नाही जमलं तरी संपूर्ण एक दिवस मजेत घालवायचा असेल तरी देखील या ठिकाणाची निवड नक्कीच योग्य राहील.



जाधव गडावर मला सगळ्यात जास्त आवडलेली  जागा म्हणजे इथला "स्विमिंग पूल" जो किल्याच्या सगळ्यात उंचावर आहेत. त्यामुळे याठिकाणावरून म्हणजे किल्याच्या तटबंदीवरुन आजूबाजूची गाव आणि बाकीचा परिसर सहजच नजरेस पडतो. इथे संध्याकाळी निवांत पडून राहायचं आणि मस्तपैकी जोडीदारासोबत इथल्या थंड हवेची झुलूक कॉफी सोबत अनुभवायची आणि ती देखील एखाद्या तुमच्या आवडत्या गजल सोबत … . हा हा हा …नुसता विचार केला तरी किती थंड वाटत नाही का.

या किल्याला लागूनच मागच्या बाजूला एक मोठं,आलिशान असं  ३ मजली "आई" नावाचं  वस्तू-संग्रहालय आहे. विठ्ठल कामत यांची ही संकल्पना असून भारतातील अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान अशा वस्तू या संग्रहालयात पर्यटकांसाठी जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. आपल्या इतिहासातील वस्तू कश्या असायच्या आणि त्यांची वैशिट्ये या बद्दल जाणून घ्यायचे असेल तर "आई" ला संग्रहालयास आवर्जून भेट द्या.  

४. मंत्रा रिसॉर्ट



पुण्यापासून ४५-५०  किलोमीटर अंतरावरील वेल्हे मधील मंत्रा रिसॉर्ट म्हणजे अगदी निसर्गमय सहवासाचा अनुभव. उंचावर असल्यामुळे अगदी उन्हाळ्यात देखील बरं वाटेल असं ठिकाण. 
सहा महिन्यांच्या स्वानंदी सोबत मंत्रा रिसॉर्टवर (रूमच्या समोरील बाजू)

उन्हळ्यात थंडावा, हिवाळ्यात धुकं, पावसाळ्यात झरे आणि वर्षा विहाराचा आनंद घ्यायचा असेल तर हे उत्तम ठिकाण आहे. इथल्या रूमच्या मागच्या बाजूला मोठ धरण आणि दारी असल्यामुळे हवा सतत खेळती आणि प्रफुल्लित करणारी असते. मला बेबीमूनच्या निमित्तानी तर नाही पण बेबी झाल्याच्या निमित्ताने इथे जाण्याचा योग आला.
हवेतील गारवा,शुद्ध मोकळी हवा, आजूबाजूची हिरवळ, सूर्य किरणांमुळे चमकणारे धरणाचे पाणी आणि सूर्यास्त हे सगळं एकाच वेळी अनुभवयास मिळणं म्हणजे दुग्ध -शर्करा योग. जोडीदारासोबत हातात हात घालून तिन्हीसांजेला उंचावरून फक्त सूर्यास्त बघत बसायचं असेल तर .. या ठिकाणी नक्कीच जा. 

रेसॉर्टचा परिसर बराच मोठा आहे. रिसॉर्टवर स्विमिन्ग पूल, पब आणि काही लहान मोठे गेम सेंटर्स यांसारख्या ऍक्टिव्हिटी सेंटर्सनी सुसज्ज आहे त्यामुळे १-२ दिवस  अगदी आनंदात जातात.

५. लवासा मधील - एकांत 

पावसाळा  म्हटलं तर सगळे पुणेकर आवर्जून एका ठिकाणी भेट देतातच  ते म्हणजे "लवासा" आणि  याच लावासामध्ये असलेल्या  "एकांत" नावाच्या रिसॉर्टची तुम्हाला मी ओळख करून देणार आहे. 


लवासा लागण्या अगोदरच एकांत नावाच रिसॉर्ट त्याच्या उंचीमुळे आपलं लक्ष वेधून घेतं. सगळ्यात उंचावर असल्याकारणाने कोणत्याही ऋतूमध्ये जा इथल्या रूमच्या बाल्कनीमधून लवासाचं सुष्टीसौंदर्य अगदी सहजच नजरेस पडत. अगदी वाजवीदारात इथल्या रूम्स उपलब्ध आहेत. प्रेग्नेंसी मध्ये जर एकांत आणि निवांत क्षण अनुभवायचे असेल तर पुण्याजवळील या ठिकाणाला दुसरा पर्याय नाही.


प्रशस्त रूम्स आणि वूडन फ्लोअरिंगमुळे आपल्याला एक लक्झरी फील येतो. सगळ्या रूम्सला गॅलरी आणि त्यासमोर प्रायव्हसी जपणार लाँन ही या रिसॉर्टची खासियत. या रिसॉर्टच्या समोरच्या बाजूला २-३ किलोमीटरचा जंगल ट्रेल आहे. तो नक्की एन्जॉय करा. सहजच चक्कर म्हणून जंगलातून फिरताना आणि तिथे बनवलेल्या मचाणावर फोटो काढायला सॉलिड थ्रिल वाटत. 
इथे स्पाची देखील सोय आहे त्यामुळे प्रेजेन्सी मध्ये जर तुम्ही इथल्या स्पा चा अनुभव घेतला तर अगदी खरेखुरे ताजेतवाने व्हाल यात काही शंकाच नाही. 
एखाद्या निवांत संध्याकाळी इथल्या रेस्टोरंट मध्ये मेणबत्तीच्या मंद प्रकाशाखाली लवासाचे सौंदर्य न्याहाळत आणि अनेक काँटिनेंटल  पदार्थांचा आस्वाद घेत बेबीमूनचे १-२ दिवस एन्जॉय करू शकता.

मैत्रिणींनो खरं सांगू का, प्रेजेन्सी मध्ये अश्या एकांत,निवांत,निसर्गरम्य ठिकाणी जोडीदारासोबत व्यतीत केलेलं काही क्षण खूप काही देऊन जातात आणि खऱ्या अर्थाने तुम्हा दोघांना बाळाच्या निमित्तानी एकत्र आणतात. त्यामुळे कितीही जरी बिझी असाल तरी हे खास क्षण जरून अनुभवा कारण बेबीमून पुन्हा पुन्हा होणे नाही हं ..wish you all  the best!!!

"बेबीमून" डेस्टिनेशन्स - भाग १  वाचला नसेल तर नक्की वाचा म्हणजे डेस्टिनेशन निवडण्यासाठी आणखी मदत होईल. 

तुम्हाला माझी हि पोस्ट आवडली असेल तर शेजारील फेसबुक, व्हाट्सअप आणि गुगल बटणावर क्लिक करून तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा लेख जरूर शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील जरूर नोंदवा. 

Comments

  1. Very useful information... Thank you for sharing ! Keep it up...

    ReplyDelete

Post a Comment