या वर्षी मे महिन्यात उन्हाने तर उचांकच गाठला होता. त्यामुळे मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात ट्रेक ला निघणे म्हणजे आजारपण ओढवून घेण्यासारखे होते. याला पर्याय म्हणून मी स्वानंदीला घेऊन राजमाचीचा नाईट ट्रेक करायचं ठरवलं. हा माझ्या आयुष्यातील पहिला वहीला "नाईट ट्रेक"!!
पावसाळ्यात वर्षाविहारासाठी आणि हिवाळ्यात बोचरी थंडी अनुभवण्यासाठी मी या पूर्वी देखील राजमाचीवर आले होते. त्यामुळे राजमाची वाट माझ्यासाठी काही नवीन नव्हती. मात्र या वेळी ओढवलेला कठीण प्रसंग माझ्यासाठी नवीनच अनुभव देऊन गेला. अर्थात,आलेला प्रसंग बरंच काही शिकवून देखील गेला.
राजमाचीला सोबत कोण कोण येणार यावर आमचं सगळं अडलं होतं. कारण या वेळी माझ्या सोबत नेहमी असणारे माझे पती,माझी बहीण आणि चेतन यांपैकी कोणालाच काही कारणास्तव यायला जमणार नव्हत. एकीकडे मनात आलं कि प्लॅन पुढे ढकलावा पण एकीकडे वाटलं कि "चलते है ना यार" !! एकटीने तरी कधी प्रवास करणार आणि सोबत होतीच कि स्वानंदी.
नशिबाने साथ दिली. माझे दोन मित्र सोहन आणि ऋग्वेद याच ट्रेकला येणार होते हे मला समजलं. ट्रेक लीडर राहुल तांबे देखील परिचयाचे होते म्हणून जास्त काळजी वाटत नव्हती. परिस्थितीचा आढावा घेऊन विचार पक्का केला कि राजमाची नाईट ट्रेक ला स्वानंदीला घेऊन जायचंचच च.!!
या वेळी प्रवास रेल्वेने होता. संध्याकाळी ५ च्या दरम्यान आम्ही सगळे लोणावळा रेल्वे स्थानकावर भेटलो.त्यातच कविराज,त्यांची पत्नी आणि त्याची चिमुकली (माझे फेसबुक फ्रेंड आहेत) देखील या ट्रेकच्या निमित्ताने भेटले.
 |
| मेरे दोस्त लोग |
संध्याकाळचा नास्ता -पाणी घेऊन आम्ही गाडीत बसलो. साधारण १० किलोमीटर चा ट्रेक स्वानंदीला घेऊन अंधारातून चालत जायचं हे माझ्यासाठी फार मोठं आव्हान होत. ट्रेक किंवा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आपल्याला कळत न कळत बरच काही शिकवत असतात.
स्वानंदीसाठी सध्यातरी हा 'निसर्गच' मोठी शाळा आहे. या ट्रेक दरम्यान मला तिला निसर्गाचा अविष्कार असलेले "काजवे" दाखवायचे होते त्या साठीची ही खटाटोप.
 |
| एक मावळती संध्याकाळ ... |
गाडीतून उतरून आम्ही राजमाचीच्या वाटेवर लागलो. हळू हळू काळोख पसरत चालला होता आणि रातकिड्यांचे किर्रर् किर्रर्र संगीत कानावर पडत होते. काजवे बघायला तर आम्ही सगळेच जण आतुरलेले होतो. काजव्याच्या नादात सगळ्यांची पावले झपझप पडत होती. त्या अंधारात एकमेकांशी बोलत, गप्पा मारत आम्ही पुढे जात होतो.एकदा लहानसा काजवा जरी डोक्यावरून उडताना दिसला तरी सगळ्यांचे डोळे त्या एकाच काजव्याकडे लागायचे. स्वानंदीसाठी तर जणू तो एक पिटुकला दिवाच होता-उडणारा !
आम्ही त्या दाट अंधाऱ्या वाटेने पुढे पुढे सरकत होतो. जास्तीत जास्त काजवे असलेले झाड शोधायला लागलो होतो. एका आड वाटेला काजवे असलेली अनेक झाडे दिसली. असंख्य काजव्यांच्या प्रकाशाने त्या झाडाच्या सबंध फांद्याच फांद्या उजळून निघत होत्या. झाडावर एकाच वेळी अनेक काजवे चम-चम चमकत होते. कसल सॉलिड कॉर्डीनेशन होत त्यांचं काय सांगू! अगदी दिवाळीच्या दीप माळेप्रमाणे एकाच वेळी ऑन - अन एकाच वेळी ऑफ! ते क्षण न डोळ्यात साठवता येत होते न मोबाईल मध्ये कॅपचर करता येत होते. काजवे बघत आम्ही पुढे सरकत होतो स्वानंदी देखील लाईट लाईट म्हणून काजव्याचा आनंद त्या क्षणी अनुभवत होती.
सगळं काही नीट चाललं होत. काजवे होते,आम्ही सर्वे वातावरणात रममाण झालो होतो, माझ्या मुलीचा सध्यपरिस्थितीत मूड सुद्धा चांगला होता.... आणि त्यातच मी अचानक जोरात ओरडले, "आईईईई गSSS. … 'पाय गेला माझा आणि स्वानंदी सकट मी गपकन खाली बसले.पायातला शूज काढेपर्यंत जीव घामाघूम झाला. पायाच्या घोट्याने हळूहळू भयानक सूज पकडली. घामटलेल्या शरीराची धाकधूक थांबेपर्यंत डोक्यात ना ना प्रश्न मांडी घालून बसले.
 |
| कशी नशिबाने थट्टा आज मांडली ... अशीच वेळ आली होती |
एकीकडे मी धपकन खाली बसल्यामुळे स्वानंदी घाबरली होती. तिच्या रडण्याचा आवाज आणि वेगाने सुजत जाणारा पाय काहीही सुचू देत नव्हता. दहा पंधरा मिनिटे मी वेळ घेतला. स्वानंदीला शांत केल. सोहनमुळे शाश्वती झाली कि पाय मोडला नाही आहे आणि मी उभी तरी राहू शकते. आयुष्यात पहिल्यांदाच माझा पाय भयानक रीतीने मुरगळला होता (ankel ट्विस्ट हो). जरा वेळाने मी उठून उभी राहिले. घड्याळ बघितलं तर रात्रीचे ९ वाजून गेले होते. राजमाची वरच्या मुक्कामाचे ठिकाण अजून ५-६ किलोमीटर लांब होते. धड इकडे -ना तिकडे अशी माझी अवस्था. सोबत असलेल्यांनी मला घरी परत जाण्याचा सल्ला दिला.कारण स्वानंदी ला घेऊन मला रात्र काढायची होती आणि दुसऱ्या दिवसाची दुपार देखील. ग्रुप-मध्ये गाडी बोलावण्यासाठी फोनाफोनी चालू झाली आणि माझ्या डोक्यात विचार चक्र..
माझे मित्र माझ्या सोबत होते. त्यांनी मला धीर दिला. त्यामुळे मी मागे नाही तर राजमाची वर मुक्कामाच्या ठिकाणी पुढे जायची इच्छा व्यक्त केली. आनंदाची गोष्ट म्हणजे नंतर सगळ्यांनी त्याला मान्यता देखील दर्शवली. सर्वांच्या मदतीने आणि धीराने मी उभी राहिले.या वेळी स्वानंदी कोणाही जवळ जायला तयार नव्हती. माझी शाररिक अवस्था एक पाय काम करत नसल्याने ढासळली होती.अचानक आलेल्या बिकट परिस्थितीने मूड देखील खराब झाला होता. तेवढयात एक गाडी आली. त्यांनी मला गडावर नेण्यासाठी मदत केली. स्वानंदी , तिची कॅरियर बॅग, माझे शूज, आमच्या दोघींच्या सामानाची बॅग या सगळ्या पसाऱ्यानिशी आम्ही गाडीत कोंबले गेलो.
आयुष्यात आणि प्रवासात काय कधी काय प्रसंग येईल काहीही सांगता येणार नाही.. पण अशा स्थितीत न डगमगता पुढे चालत गेले पाहिजे हे मी यातून शिकले.
 |
| पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य |
किल्यांवरच्या जुन्या पद्धतीच्या घरात राहायची मज्जा काही औरच असते. भलं मोठं आंगण आणि पडवी असल्याने स्वानंदी अगदी कोंबडी प्रमाणे इकडे तिकडे पळत होती. त्यामुळे एका पायावर लंगडी घालत तिला जेवण भरवणे मला राजमाची चढण्यापेक्षाही जास्त आव्हानात्मक वाटत होत.(शाळेत लंगडी स्पर्धेत कायम पुढे असल्याचा फायदा झाला असं वाटलं) ती इकडे- तिकडे बागडून मनमुराद त्या मोकळ्या जागेचा आनंद घेत होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मी डोळे पुसूत होते. तिच हासू माझ्या वेदना दूर करण्यास मदत करत होती.(जास्तच सेंटी झालं का?)
आमची जेवण उरकली. माझे मित्र,सोबती तोपर्यंत गड चढून आले. त्यांनी ही जेवण केलं. वाघमारे यांच्या कडे आम्ही राहायला होतो. त्यांनी गरम गरम हळद शिजवून दिली. पायावर घातली. हळदीच्या चटक्याने ठणका जरा शांत झाला.
डोळ्यासमोर नवऱ्याचा, बहिणीचा आणि चेतनचा चेहरा फिरत होता. आता ते असते तर ....!
या कल्पनेतच रात्रीचे २ वाजले. पायाचा ठणका मेंदू पर्यंत जात होता. जरा डोळा लागतो ना लागतो तोच कोंबड्याने पहाट झाल्याचा गजर चालू केला. त्या शांततेत कोंबड्याच्या आवाज खूपच कर्कश वाटत होता. त्या आवाजाची मला जाम भीती वाटत होती... कारण स्वानंदी याच्या आवाजाने उठली तर??? हा गंभीर प्रश्न माझ्यासमोर होता.
 |
| रानमेवा - करवंद!! ती पण ताजी आणि रसरशीत. |
पहाटे पाच-साडेपाच पर्यंत कोंबड्याने काही उरकत घेतलं नाही. शेवटी मीच उठले. स्वतःच्या टुम्ब सुजलेल्या पायाकडे कुतूहलाने पाहत होते.विचार करत होते कि - किती काय शिकवून गेला हा एक अनपेक्षित प्रसंग!. एक समाधानाचं हास्य माझ्या चेहऱ्यावर होत कारण, आता रात्र सरली होती. तांबडं फुटत चाललं होत. माझ्या सोबत असलेले सगळे जण आवरून मनोरंजन किल्याकडे जाण्यासाठी तयार झाले. मला ते जमू शकणार नव्हतं म्हणून मी जरा नाराज झाले.
 |
| उदयसागर तलाव |
काही वेळाने स्वानंदीला जाग आली. सकाळचं सगळं आवरून झालं. त्यानंतर माझ्या सोबत असलेले सगळे कार्यकर्ते किल्ला बघून परतले. पुढे आता जवळच असलेल्या उदयसागर तलाव आणि जुनं महादेवाच्या मंदिरला भेट देण्यासाठी ते निघत होते. सगळे आपल्याला ठेऊन जात आहेत हे पाहून स्वानंदीने किल्ला बघायला ने म्हणून हट्ट पकडला.तिला उचलून मला कितपत चालता येईल याची शाश्वती नव्हती. तिच्या हट्टाचे रूपांतर काही वेळातच जोरजोरात रडण्यात बदललं. मला नाईलाजाने खोली बाहेर पडाव लागलं. सुजलेल्या पायांमुळे तिला उचलून चालताना डोळ्यासमोर काजवेच चमकत होते. या प्रसंगामुळे शाळेत शिकलेल्या 'डोळ्यासमोर काजवे चमकणे!" या वाक्यप्रचाराचा मला खऱ्या अर्थाने प्रत्यय इथे आला.
 |
| महादेवाचे जुने मंदिर |
पायात चप्पल आणि हळदीने पिवळा झालेला पाय लंगडवत मी स्वानंदीला घेऊन तलावाकडे निघाले. सुदैवाने तलावापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या होत्या. एका पायावर लंगडी घालत मी कशीबशी तिथे पोहचले. पायऱ्या उतरत इथपर्यंत यायला तर जमलं, पण अता जायचं कसं?? या विचाराने च मला कस- कसं होत होत. पण सोबतच्या मित्रांमुळे सर्व चिंता दूर झाली.
 |
| श्री कविराज आणि त्यांच्या कुटुंबासमावेत |
स्वानंदीला पाणी खूप आवडत. तिने निवांत पाय टाकून पाण्याचा आणि तिथल्या निसरम्य वातावरणाचा आनंद घेतला. जाम खुश झाली ती तो तलाव बघून.तिचा मूड देखील एकाएकी चांगला झाला. तिच्या चेहऱ्यावरच्या एका हसूमुळे घरापासून इतक्या दूर येण्याचं सार्थक झालं असं वाटलं. तिला किल्ला दाखवण्याची अपेक्षा तर नाही पूर्ण करता आली पण इथं पर्यंत आल्याचे समाधान मात्र वाटत होत.
 |
| आहे कि नाही निवांत एकदम .... |
अशा रीतीने या चिमुकलीने माझे कळत न कळत मनोबल वाढवले आणि "YES, आई! You can do it! हे देखील पटवून दिल.
सोहन,ऋग्वेद आणि कविराज हे जर माझ्या सोबत नसते तर कदाचित मी ही राजमाची अशा वेगळ्या पद्धतीने अनुभवलीच नसती.पाय जरी मुरगळगळेल होता तरी मन कणखर होत.या राजमाची च्या प्रवासाने आणि स्वानंदीच्या हट्टाने मला आणखीनच धैर्यशाली बनवलं असं मी म्हणेन.
Story narration was too Awsm !! And really need to appreciate you for taking so much pain and still moving forward :)) hat's off
ReplyDeleteThank you...
Deletekhup chan lihal ahes....mastch. keep it up.
ReplyDelete