महाराष्ट्रातील पावसाळा म्हणजे सर्व निसर्गप्रेमींकरिता पर्वणीच असते. नवी नवरी जशी सजावी तशी ही महाराष्ट्राची भूमी हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटते. निसर्गाच्या सौंदर्याचे गोडवे गाणारे आणि त्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेणारे भटके महाराष्ट्राच्या दऱ्या- खोऱ्यात दिसू लागतात.माझे कुटुंब देखील याच माळेतील मणी!
२०१८ नोव्हेंबर मध्ये मी स्वानंदीला घेऊन सोपा आणि लहान किल्ला म्हणून
लोहगड ची निवड केली होती. माझ्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन २०१९ मध्ये दरमहिना एक याप्रमाणे किल्ले सर करायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच वाटचालीला सुरुवात झाली.माझ्या ओळखीच्या अनेक जणांना,मित्र-मैत्रिणींना ट्रेक चा अनुभव घ्यायचा होता तो देखील - कुटुंबासोबत. पावसाळ्यात सर्वांना भटकायला आवडतं त्यामुळे सर्वांचा म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या दृष्टीने लहान आणि सोपा म्हणून "लोहगड"ची निवड केली.
या वर्षी पावसाने हजेरी लावायला नेहमी प्रमाणे उशीर केला.सह्याद्रीच्या कुशीत हुंदडायचं म्हणजे हवेत गारवा आणि डोक्यावर पाऊस हवाच. पावसाची खूप वाट पाहत आणि हवामान खात्याच्या भरोवशावर राहून आम्ही "लोहगड"ट्रेकचा मुहूर्त काढला. जूनच्या महिना अखेरीस सर्वांसाठी म्हणजे लहान मुले, कुटुंब ,आज्जी- आजोबा ,नवखे (beginners) सर्वांसाठी "लोहगड ट्रेक" आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला. त्याच दिवशी म्हणजे ३० जून २०१९ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातून या विषयीचा विशेष लेख आणि त्या मागची विचारधारा देखील प्रसारित झाली.
 |
| ३० जून २०१९ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रात प्रसारित झालेला विशेष लेख |
३० जून २०१९,रोजी आम्ही तब्बल ११-१२ कुटुंबांना , १२ नवख्या ट्रेकर्सना आणि १३ लहान मुलांना घेऊन एकत्ररित्या लोहगड चा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. सहा महिन्यापूर्वी माझ्या मनी-ध्यानी देखील आलं नव्हतं कि ५० जणांना सोबत घेऊन पुन्हा एकदा लोहगडला येणं होईल.
या लोहगडाच्या तर मला बरंच काही दिलं पण या दिवशी अनेक महिलांना,मुलींना देखील या किल्ल्याने एक एक आत्मविश्वास दिला कि- "तुम्ही देखील किल्ले सर करू शकता,ते देखील तुमच्या कुटुंबासोबत"!
सकाळी सगळे ८ च्या दरम्यान मळवलीला पोहचलो . नास्ता-पाणी घेऊन आम्ही लोहगड कडे चालायला सुरुवात केली. वाटेत अनेक धबधबे आमचे स्वागत करत होते. इतकं सुंदर वातावरण आणि मनमोहक स्वच्छ पाणी बघून अनेकांना त्यात डुंबायचा मोह झाला खरा.
आम्ही आमची वाट पकडून पुढे गडाच्या दिशेने जात होतो. रिमझिम पडणारा पाऊस आमचा उत्साह वाढवत होता. धुक्यात हरवलेली वाट शोधात आम्ही पुढे चाललो होतो. ढगात लपलेली किल्याची तटबंदी आम्हाला साद घालत होती. या सर्व वातावरणामुळे पावले झप झपच पडत. साधारण ३ किलोमीटर चालून आम्ही पायथ्याला पोहचलो. जरावेळ आराम करून - लोहगडाकडे निघालो.
किल्ला चढण्याचा अनेक लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एकत्रितपणे हा पहिलाच अनुभव असल्याने सगळ्यांचे चेहरे आणि देहबोली अगदी खुलून गेली होती. मुले तर कोण आधी चढणार याच शर्यतीत होती.निसर्गाची साथ लाभली. पाऊस ये-जा करत होता. पायर्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात उड्या मारत मुले तर अगदी आनंदाने सर सर पुढे जात होती.
रमत गमत किल्ला सर केला. किल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पोहचून आम्ही सर्वानी या वर्षी एव्हरेस्ट सर करताना मृत्युमुखी पडलेल्या एव्हरेस्टवीरांना श्रद्धांजली वाहिली तसेच ही मोहीम युनाइटेड नॅशन चा गोल ५ -"ही फॉर शी"(HeForShe) ला समर्पित केली.
 |
| UN goal - ५ He for She |
किल्याच्या पटांगणात सर्वानी वर्षाविहाराचा आनंद घेतला. सुरुवातीला पावसामुळे किल्ल्यावरून सहजच दिसणारी गावे ढगात हरवून गेली होती. पण त्या दिवशी निसर्गाची आमच्यावर कृपा च होती असं म्हणावं लागेल. कारण काही क्षणातच सर्व ढग निघून गेले. हिरवी शाल पांघरलेला परिसर आणि आजूबाजूची गावे सहजच नजरेस पडू लागली. क्षणाचाही विलंब न करता सोबत आलेल्या मित्रमैत्रिणींनी ते सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपले आणि मी डोळ्यात.
 |
| आकाश मोकळं झालं आणि नयनरम्य परिसर नजरेस पडला. |
या सगळ्या वातावरणात स्वानंदी देखील अगदी मस्त रमली होती. सर्वांसोबत ती देखील आयुष्यातील पहिला रेनकोट घालून,कुडकुडत मस्तपैकी या वर्षाविहाराचा आनंद घेत होती.
 |
| माझे कुटुंब |
अवघ्या सहा-सात महिन्यातच माझ्या विचारांसोबत अनेक कुटुंब जोडली गेले आणि या सुप्त विचारांना नवी पालवी फुटली. पन्नास जणांना सोबत घेऊन केलेला लोहगडचा ट्रेक हे त्याचाच एक जिवंत उदाहरण. या सर्व विचारांचा आणि कार्याचा वटवृक्ष होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
 |
| २०१८ नोव्हेंबर आणि २०१९ जून महिना |
Comments
Post a Comment