२०२० मोहीम, जानेवारी किल्ला १ ला - शिवनेरी
नमस्कार वाचकांनो,
२०१९ आमच्या आयुष्यातील अत्यंत उलाढाल झालेलं असं वर्ष. हो,चांगल्याच अर्थानी.
२०१९ मध्ये स्वानंदी या माझ्या दोन वर्षाच्या मुलीसोबत "१२ महीने १२ किल्ले" ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. आनंदाची बातमी म्हणजे या मोहिमेची दखल सकाळ आणि सकाळ टाइम्स या पुण्यातील नामांकित वर्तमान पत्रांनी देखील घेतली. प्रवास.. १२ महिने १२ किल्यांचा... प्रवास माझा आणि माझ्या दोन वर्षाच्या चिमुरडीचा हा माझा लेख सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पावणे दोन लाख जनतेपर्यंत पोहचला. अनेकांनी त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या मुलांसोबत या वर्षीचा 'गडकिल्ले भटकंतीचा' उपक्रम देखील आखला.
![]() |
| १६ डिसेम्बर २०१९ सकाळ वर्तमान पत्रातील पहिल्या पानावरील बातमी |
![]() |
| १५ डिसेम्बर २०१९ सकाळ टाइम्स या वर्तमान पत्रातील पहिल्या पानावरील बातमी |
२०१९ सरल. आता २०२० मध्ये काय याचे वेध अनेकांना लागले होते. वाचकांमधूनच काही जणांनी ओळखलं कि "२०२० ला २० किल्यांची मोहीम" !! बरोबर आहे. पण माझा प्रयत्न "२०२०, १२ महीने २४ किल्ले" असा राहील. इच्छा तर ३५० किल्ले करायचीच आहे पण संसार- काम- मुलीची शाळा आणि स्वतःची तब्येत हे सगळं सांभाळून सध्या तरी २४ आकडाच बरा वाटतोय.
२५ जानेवारी २०२० रोजी, जुन्नर तालुक्याचा शिरपेच असलेला आणि छत्रपती शिवाजी महारांचे जन्मस्थान असलेला किल्ले "शिवनेरी" गाठला. पुण्यापासून जुन्नर अगदी दोन तासांच्या अंतरावर. त्यामुळे पुण्यातून आरामात निघून एका दिवसात बघता येईल असा ऐतिहासिक किल्ला निवडला !
ज्यांनी महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राचा इतिहास घडवला अशा देवतेचे म्हणजेच - शिवाजी महाराजांचे जन्मस्थान पाहण्याचा योग शाळेच्या दिवसानंतर आज आला होता. त्यामुळे शाळेच्या धुसर आठवणी मनात ठेऊन किल्याकडे निघताना मन खुश होत. खास स्वानंदीला दाखवण्यासाठी आणि शिवाई देवीचा सदर मोहिमेसाठी आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून "शिवनेरी" हा पहिला किल्ला निवडला.
सध्यातरी किल्यावरच्या डागडुजीमुळे आणि स्वच्छतेमुळे प्रसन्नता नांदत आहे. सहज चालत चालत पाहता येईल असा हा भव्य किल्ला. ३५०० फूट उंच असलेल्या किल्ल्यावर जाण्यासाठी अत्यंत सुलभ अशा पायऱ्या आहेत. महादरवाज्यातून आत आल्यावर सुबक असा मेणा दरवाजा, कुलूप दरवाजा, पीर दरवाजा लागतो. या दरवाज्यांच्या कमानी उत्तम स्थितीत आहेत.
| वेगवेगळे दरवाजे आणि सुंदर कमानी |
| अंबारखाना |
| महाराजांचे जन्मस्थान. सुंदर कलाकृती असलेल्या खिडक्या आणि एकंदर रचना शिवकाळात घेऊन जाते. |
कडेलोट या ठिकाणी वाहणारा वारा आणि या ठिकाणाची एकंदर शांतता मनाला प्रसन्नता देऊन जाते. सायंकाळ होत होती. पाऊल आणि मन मागे फिरायला तयारच नव्हतं. कारण कडेलोटावरून अथांग निसर्ग आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा तिथेच थांबून ठेवत होत्या. खरंच तिथून परतायची इच्छाच' होत नव्हती, मात्र "शिवाई" देवीचे दर्शन पण राहिले होते त्यामुळे गड उतार होणं जरुरीचं होत.
| शिवाई देवीचे मंदिर आणि प्रवेशद्वाराची कमान |
साधारण ३-४ तासात आम्ही "शिवमय" झालो होतो. गड उतरताना आम्ही तिथल्याच एका बागेत बसून निसर्गाचा आनंद घेत पेटपूजा केली.
![]() |
| कोणी दिसतंय का सहज ??? |






Comments
Post a Comment