२०२० मोहीम, जानेवारी २ रा किल्ला - "चावंड" एक आडवाटेचा किल्ला
या वर्षीच्या मोहीमे अंतर्गत जमेल तसं एखाद्या आडवाटेवरील किल्ल्याला (सहसा कोणी करत नाही असा ) भेट द्यावी अशी कल्पना मनात आली. त्यामागे दोन हेतूआहेत :-
पहिला हेतू म्हणजे - माझ्या लिखाणाद्वारे असे किल्ले आणि त्याचे वर्णन आवडल्यास नक्कीच दुर्गप्रेमी अशा स्थळांना भेटी देऊ शकतील.
दुसरा हेतू म्हणजे - दुर्ग प्रेमींच्या भेटी वाढल्यास अशा किल्यांच्या पायथ्याला असलेल्या गावात या न त्या कारणाने रोजगार निर्मिती देखील होऊशकेल.
या विचारांमुळे आम्ही चावंड या किल्याची निवड शिवनेरी सोबत केली. एकाच दिवशी "चावंड " म्हणजेच "प्रसन्नगड" हा आडवाटेवरील किल्ला आणि "जीवधन" असे हे दोनही किल्ले २६ जानेवारी २०२० या अनोख्या दिवशी करायचं ठरवलं.
| चढाई करताना थंड वातावरणाचा आनंद घेताना आम्ही माय लेकी |
चावंड किल्याकडे पायथ्या पासून पाहिल्यास त्याचा दिसणारा एकंदर विस्तार आणि उभारी पाहून किल्ला नक्की चढता येईल का? अशी शंका माझ्या मनात आली देखील. मात्र, व्यवस्थित असलेल्या पायऱ्या आणि लोखंडी रेलिंगमुळे सुरक्षितपणे जाता आलं.
| सुरक्षित पायऱ्या आणि रेलिंग मुळे चढाई सहज होते. |
पायऱ्या चढताना मध्ये अत्यंत अरुंद अशी वाट लागली. अगदी लहानशी, म्हणजे एका वेळी एक व्यक्ती आणि त्या एका व्यक्तीच एकच पाऊल तिथे ठेवता येईल इतकीशी ती वाट! क्षणभर वाटले कि मी वाटेत स्वानंदीच्या बॅगेसकट अडकेलच. मात्र आमच्या सोबत असलेल्या रोहीत या मित्राने पावलोपावली मार्गर्शन केले आणि अवघड वाट सोपी करून दिली. स्वतःला आणि पाठीवरील स्वानंदी व तिच्या बॅगेला वेगवेगळ्या रितीने अगदी सावधरीत्या आडवं-तिडवं करून पाच पावलांचा पहिला थरारक असा तो टप्पा पार केला. मागे वळून पाहिलं तेव्हा पाण्याच्या डोहांच्या दिशेकडुन आलेल्या वाऱ्याच्या थंड झुळुकीने माझा घाम पुसला आणि हसत हसत स्वागत देखील केले. सोबत आदिनाथ आणि रोहित हे संपूर्ण वाटेवर माझे मार्गदर्शक होते.
![]() |
| पायऱ्यांचा शेवटचा टप्पा - "मला पण किल्ला स्वतः चढायचा " अशी म्हणणारी स्वानंदी अवघड टप्पे हळूहळू सर करायला लागली आहे. |
| कोवळ्या उन्हाचा आनंद वेगळाच आहे आणि त्यात समोरच चित्रात रेखाटल्याप्रमाणे असलेले पाण्याचे स्रोत |
| सजवलेली तोफ आणि सजवलेले प्रवेशद्वार |
संपूर्ण प्रवासात पूर्वेला असलेला उभ्या कातळामुळे उन्ह डोक्यावर आले तरी फार जाणवले नाही. अशा या वातावरणात संपूर्ण किल्ला पाहायला अजिबात त्रास झाला नाही. वाळलेल्या-पिवळ्या पडलेल्या गवतातून चालताना काहीशी काळजी घेऊन आम्ही भराभर पुढे सरकत होतो.
सपाट भूभागावर स्वानंदी देखील भरपूर चालते. किल्ला पाहायला पायवाटा देखील सहज सापडतात.त्यामुळे इथे हरवण्याची अशी काही भीती नाही. चावंड किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे - तुडुंब पाण्याने भरलेल्या सात टाक्यांचा समूह! तसेच वेळ काढून आणि किल्याबद्ल माहिती वाचून गेल्यास नक्कीच हा किल्ला वेगळा भासतो.
![]() |
| सात टाक्यांपैकी एक टाके आणि त्या समोरील नक्षीकाम केलेली दगडी कमान. |
किल्यावर वाड्यांचे काहीसे अवशेष पाहावयास मिळाले. तसेच शिवकालीन स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था आणि काही मंदिरांचे अवशेष पाहण्यासारखे आहेत.
![]() |
| चतुर्भुज चावंडामातेचे छोटेखानी रचनेत असलेले मंदिर |
| राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा मंदिरासमोर सन्मान ! |
रोहीत या आमच्या गिर्यारोहक मित्राने चावंडाच्या माथ्यावरून आजूबाजूला असलेले - शिवनेरी, हडसर,निमगिरी या किल्यांचे दर्शन घडविले. त्याचप्रमाणे या किल्ल्यावरून माणिकडोहचे निळेशार पाण्याने मन मोहून घेतलं.
अडीच - तीन तासात व्यवस्थितरीत्या किल्ला पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा त्या पायऱ्यांच्या वाटेवरून गड उतरायला लागलो. स्वानंदीला घेऊन चढण्यापेक्षा उतरताना खरा कस लागतो. मात्र, तीच आहे जिच्यासाठी आणि जिच्यामुळे आज मी महाराष्ट्र दर्शन करत आहे आणि इतिहासाला खऱ्या अर्थाने समजून घेत आहे.
![]() |
जुन्नरमधील शिवनेरी ला दिलेली अविस्मरणीय भेट या विषयी चा २०२० मोहीम, जानेवारी किल्ला १ ला - शिवनेरी हा लेख आवर्जून वाचा.







Comments
Post a Comment