नागफणी कड्याची अनपेक्षित भेट !
शुक्रवारच्या पहाटे ३. ३० वाजता माझ्या घरातलली भांडी वाजू लागली. पटपट १०-१५ चपात्या आणि २ जेवण करता येतील अशा खाऱ्या वांग्याची भाजी बनवून डबा तयार झाला. कपाटातील ट्रेकिंगची बॅग बाहेर आली. पाण्याच्या ५ बाटल्या त्यात भरल्या गेल्या. दोन दिवस लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी बॅग मध्ये भरल्या, गाडीला किक मारली आणि आमची स्वारी निघाली, लोणावळ्याला. मी व माझे सहकारी मित्र तुषार दिघे,लहू उघडे, कृष्णा मर्गळे, मुंबईचा मनोज वांगड, योगेश करे रस्त्यात एका ठिकाणी भेटलो. पुढचा प्रवास चालू झाला.
ठरल्याप्रमाणे आधी तैल-बैल गाव गाठलं, तिथे वाटेत घरून आणलेल्या डब्यावर सगळ्यांनी ताव मारला. पेटपूजा झाली. पोटातील कावळे शांत झाले. ऊन वाढलं होत. तैलबैलाच्या कातळ भिंती खुणावत होत्या. आम्ही प्रत्येकजण स्वतःची बॅग व चढाईसाठी लागणारे इतर साहित्य घेऊन मार्गस्थ झालो. काही करणास्थव आम्हाला तिथल्या गावातील लोकांनी चढाई करू दिली नाही. त्यामुळे मंदिरात नमस्कार करूनच माघार घेतली. पुढे कुठे? हा प्रश्न उभा ठाकला.
ठरलं! ड्युक्स नोज - 'नागफणी' ला चढाई करायची. हिरमुसलेली तोंड घेऊन आम्ही माघारी पुन्हा लोणावळा शहरात आलो.
लोणावळा गावात न जाता, गावाच्या मागच्या बाजूने नागफणीकडे जाण्याची वाट पकडली. एका स्थानिक मित्राच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या. ज्यांनी त्यांनी स्वतःच सामान घेतलं. रस्त्याचं काम चालू असलेल्या एका ठिकाणाहून २ कॅन पाणी भरून घेतले. कॅनमधलं भरपूर पाणी बघून मॅगी, मसाले भात बनवण्याची स्वप्न रंगात येऊ लागली.
पुढच्या १०-१५ मिनिटात आम्ही ड्युक्स नोज समोरच्या पठारावर पोहचलो. अंगावरच ओझं उतरवल. नागफणीकडा आयुष्यात पहिल्यांदाच डोळ्यासमोर आला. ३००फुटी उभा नागफणी बघून तो एकदम अंगावर आल्याप्रमाणे भासला. आम्ही सर्वानी आ वासाला. प्रचंड मोठा आणि भव्य कातळ पाहून कोणाचच तोंड बंद होईना. आपण यावर चढाई करायची उद्या? पण जमेल का ? आईशप्पथ ! बापरे! यासारखे उदगार कानावर पडू लागले. मोहिमेचा लीडर - लहू! 'घाबरता कशाला ? जमेल आपल्याला आणि या आधीचा अनुभव नक्कीच उपयोगाला येईल' असं म्हणून धीर देऊ लागला. मी तर सुळ्याकडे बघतच बसले. नक्की कुठे कुठे होल्ड्स आहेत ते डोळे फाडून बघत होते, तरी दिसेना. पण सोबतचे सहकारी धीराचे होते त्यामुळे अर्धी लढाई तिथेच जिंकली होती. मनात आलं, चढाईसाठी लागणार उत्तम प्रतीचं साहित्य आणि अनुभवी मित्र परिवार असल्यावर चिंता कशाला करायची. संध्याकाळचा वेळ विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमामुळे कारणी लागला.
एकमेकास साहाय्य करू।अवघे धरू सुपंथ । हे वचन तंतोतंत पाळण्यात आलं व मी हॅन्ड स्टॅन्डशिकले.
लोणावळा आता टिमटिमणाऱ्या दिवांच्या प्रकाशात चकचकायला लागला होता. आमची झालेली पळापळ आणि निघालेला घाम येणाऱ्या थंड हवेच्या झुळुकेत विसावू लागला होता. सूर्य देखील पश्चिमेला केसरी रंग फेकत विसावत होता. नागफणीच्या माथ्यावरून हे सार एका जागी बसून आम्ही पाहत होतो, अनुभवत होतो. माझी तर मावळत्या सूर्याकडे बघण्यात तंद्री लागली होती. आमच्या गप्पा रंगात येत होत्या. पुढे आणखी कोणकोणत्या मोहीमा करायच्या, कशा पद्धतीने करायच्या या बद्दल विचार मांडण्यात येऊ लागले. सूर्य मावळत होता, तर आमच्या पुढल्या वाटचालीचे विचार उदयास येत होते.
रात्र झाली. तीन तंबू ठोकले गेले. रात्रीच जेवण म्हणून उरलेली उकडलेली अंडी, एक दोन गूळपोळ्या घशात घातल्या आणि सर्व झोपी गेलो.
पहाटे पाच वाजता डोळा उघडला. सूर्य उगवला, सकाळ झाली. आजूबाजूचा परिसर नजरेस दिसू लागला. पक्षी शिट्या फुंकू लागले, किलबिलाट चालू झाला.सगळीकडे ढगांची पांढरी चादर पसरली होती. कालचा भीती घालणारा नागफणी कातळ देखील ढगांमध्ये विरघळून गेला होता. थोड्या वेळाने तर लपाछपी चालू झाली. सूर्य देव मात्र आज थंडच होते. हा खेळ कधी संपणार याची आम्ही वाट पाहू लागलो. तो पर्यंत मोजून तीन दगडांवर मांडलेल्या चुली भोवती मॅगीचा वास घमघमू लगला .
मॅगी खाल्यावर मात्र आता या ३०० फुटाच्या कातळावर नक्कीच चढाई यशस्वी होईल असा आत्मविश्वास जागरूक झाला. अंगात एकदम बळ आलं. चढाईसाठी सज्ज झालो. आता तर कडा दिसू लागला आणि होल्ड्स देखील.
सुळक्याच्या आरंभ स्थानी जाताना.
रोप्स, कॅरिबिनार, डीसेंडरच्या तालावर आता यापल्याकडून त्या पल्याकडे जायचं होत. वाट लहानच होती पण अवघड व असुरक्षित होती, रोपच्या मदतीने सुळक्याच्या आरंभ बिंदूपाशी पोहचलो. सकाळच्या ७. ३० वाजताच्या मुहूर्तावर तुषार आणि कृष्णा या मित्रांनी चढाईला सुरुवात केली. तुषारने पाहिलं स्टेशन गाठलं. त्यामागे कृष्णाने सरसर पहिला टप्पा गाठला. नंतर माझी वेळ आली.
तुषार आणि कृष्णा अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या स्टेशनवर.
पायथ्याशी मी आणि मनोज तयारीनिशी
पहिला टप्पा १००-१२५ फुटापेक्षा जरा जास्त होता. माझ्यासारख्या शिकाऊ गिर्यारोहकांसाठी कठीण होता. लहान सहान फूट होल्ड्स, सोयीनुसार योग्य वाटेल तशे हॅन्ड होल्ड्स घेऊन हा टप्पा पूर्ण केला. 'लैच भारी' चा अनुभव आला! त्यांनतर दुसरा आणि तिसरा टप्पा तसे लहान होते. साधारण ३०, २५ फूट उंचीचे. पण घाम काढणारे. तिथेही तीच गत . बऱ्यापैकी लहान अशा फूट होल्ड्स चा वापर करून स्वबळावर तो पार करण्यात आला. आत्मविश्वास वाढला.
केशरी रंगाचा ठिपका म्हणजे मी .. चढाईला सुरुवात केलेली.
मी पुढे, माझ्या मागे मनोज. त्याला बिले द्यायचा म्हणून मी कृष्णा जवळ तिसऱ्या स्टेशनला येऊन थांबले. मी आल्यावर कृष्णा पुढल्या स्टेशनसाठी निघून गेला. बिलेचा योग्य सेट अप लावून मनोज देखील वर आला. त्या पॉईंट वरून दिसणारा नजारा मन जिंकून घेणारा होता.
शेवटचा टप्पा जरासा ट्रॅव्हर्स मारून चढायचा होता. तिथपर्यंतच्या एका टप्प्याने (जिथे आर्टीफिसिअल अँकरिंग केले जाते ) म्हणजे क्रॅक जिथे आहे तिथे, अंगात होती नव्हती सगळी ताकद संपवली होती. पाठीवर लावलेल्या बॅगेतील खजुराने, चिक्कीने आणि पाण्याच्या दोन चार घोटांमुळे इथं पर्यंत तग धरत चढाई झाली होती. आता अंतिम टप्पा नजरेस दिसत होता.काल पर्यंत अशक्य वाटणारा कडा ९०% चढून झाला होता. मन थुई थुई नाचत होत. सूर्याने डोकं वर काढलं आम्हाला आशीर्वाद दिले.
शेवटचा टप्पा कठीण नव्हता पण फारच नाजूक होता. शरीराचे जास्त वजन पडले तर एकदा होल्ड, मोठा दगड नक्कीच निसटून येईल इतका नाजूक. स्वतःच्या वजनाचा कमीत कमी वापर करून असे निखळणारे होल्ड्स कसे वापरायचे हे मात्र या टप्प्याने मला शिकवलं. नागफणीचा अंतिम टप्पा आम्ही सर्वानी सुरक्षितरित्या पार केला. मंदिर गाठलं.
आमच्या पाठोपाठ योगेश करे आणि सर्वात अखेरीस सेट अप उडवत अवघ्या काही वेळेत लहू देखील मंदिरापाशी येऊन पोहचला . दुपारच्या १ . ३० वाजता सगळ्याच समिट झालं.
ड्युक्स नोज वर लहू उघडे, तुषार दिघे,मी कृष्णा मरगळे, योगेश करे आणि मनोज वांगड
एकमेकांचं कौतुक करून बेस कॅम्प च्या मार्गाला लागलो.
सुळक्याची उंची - ३०० फूट
राहण्याची सोय - पठारावर तंबू ठोकून.
पाण्याची सोय - गावात
टप्पे - ४
श्रेणी- अवघड
लागणार वेळ - ५ ते ७ तास (किती जण आहेत यावर अवलंबून आहे, दिलेली वेळ ६ जणांकरिता नोंदवण्यात आली आहे.)
* सुळक्यावर स्की (SCI) बोल्टिंग आहे त्यामुळे क्लाइंबिंग सुरक्षित आहे.
लेख आवडला असल्यास या पेज ला like आणि follow करा. या क्षेत्रातील तुमच्या तीन गिर्यारोहक (ट्रेकर) मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा म्हणजे त्यांना या पानावरील नवनवीन ठिकाणांची, चढाईची माहिती मिळेल.















Dukes nose उंची 800 फूट, वरील टप्पा 300 फूट , सुळका नाही, कडा किंवा टोक म्हणावे, लिखाण जमतंय!! थोडा इतिहास जोड त्यात, 1985 86 प्रथम चढाई अरुण सावंत, सतीश आंबेरकर, पोलीस संजय... आणि सदस्य, sci rebolting 2006, पूर्ण कडा चढ एकदा तळापासून, म्हणजे चढाई सफल होईल, विवेक मराठे - पुणे (घाऱ्या)
ReplyDeleteसर तुम्ही हा लेख वाचला हेच माझं भाग्य आहे. तुम्ही सुचवलेले बदल केले. तुम्ही नमूद केल्याप्रमाणे परत एकदा खाल पासूनच चढाई करू.
Delete