आदराई जंगल ट्रेक! एक हलका फुलका परफेक्ट पावसाळी ट्रेक!
जुन्नर मधील खिरेश्वर या गावाजवळ असलेल्या आदराईजंगलात भटकण्याचा योग या वर्षी लवकरच आला.पहाटे आम्ही साधारण ५. ४५ ला पुण्याहून खिरेश्वरकडे निघालो.
पुण्यातून निघालो तेव्हा वातावरण ढगाळ होतं, पण पाऊस मात्र बिलकुल नव्हता. पुढे पावसाची चिन्ह दिसत होती मात्र, पडेल का नाही यात मात्र शंकाच होती. आळेफाट्याजवळ पोहचताच हलका-हलका पाऊस रस्ता भिजवत होता. शेतांच्या वाफार्यांमध्ये हिरव्या अंकुरांनी आता माती घरून ठेवलेली दिसली. पावसामुळे झाडे देखील स्वच्छ धुऊन निघालेली होती. दोन तासांनी पिंपळेगावच धरण लागलं. अवघ्या १०-१५ मिनिटातच आम्ही खिरेश्वर गावात पोहचलो.
हा ट्रेक सहज सोपा आणि केवळ वर्षाविहाराचा आनंद घेणे या उद्देशाने आखला होता. म्हणून या ट्रेक ला स्वानंदी देखील माझ्या सोबत आली होती. सकाळी अगदीच म्हणजे पहाटे ४. ३० ला उठल्यामुळे स्वारीचा मूड निम्मा अर्धा झोपेत होता. हिरवी गार कुरणं, शेतातून वाहणारे पाणी आणि त्या हिरव्या हिरव्या कुरणांवर पांढऱ्या बगळ्यांची भरलेली शाळा!! हे पाहून स्वानंदी जाम खुश झाली.
नास्ता झाला. गरम गरम पोहे आणि चहा पोटात गेले. आता आम्ही गाव सोडलं आणि जंगलाच्या दिशेने चालायला लागलो.
स्वानंदी देखील चालत होती. वातावरण आल्हादायी होत. खूप पाऊस नव्हता आणि ऊनही नव्हते. पावसाने हळू हळू हजेरी लावायला सुरुवात केली. आम्ही पुढे पुढे गर्द झाडीत आत आत जायला लागलो. तसा पावसाने जोर धरला.
सुंदर असं हे जंगल. आंबे, करवंदांच्या, सागाच्या झाडांनी भरलेलं. लहानशी वळ्णावळणाची वाट पुढे गर्द झाडीत घुसत होती.
सकाळच्या वेळी विविध पक्षांनी वेगवेगळे आवाज करून आमचे स्वागत केले असावे. पावसात भिजून आनंदून गेलेल्या पक्षांच्या किलबिलाटाने जंगल दणाणून गेलं होत. हलकंसं ऊन झाडीतून डोकावून पाहत होत. अशा रम्य वातावरणात आम्ही चालत होतो. एक तास चालल्या नंतर आता कानावर पाण्याच्या वाहत्या प्रवाहाचा आवाज पडू लागला होता. नक्कीच पुढे पाण्याचा मोठा प्रवाह वाहत आहे हे जाणवत होत. पाण्याच्या आवाजाच्या दिशेने पावले आता झपझप चालत होती. झाडीतून बाहेर येताच मोठा असा पाण्याचा प्रवाह वाहताना दिसला. किमान एक ते सव्वा तास आम्ही इथं पर्यंत पोहचण्या करिता चालत होतो. आता आम्हाला या प्रवाहाजवळ विश्रांती घेण्याची गरज वाटत होती. तिथे जवळच लहानशी टपरी होती. इथे पोहचे पर्यंत स्वानंदी देखील पूर्ण भिजली होती आणि थंडीने गारठली होती.
तब्बल दोन वर्षानंतर मी आज बेबी कॅरिअर सोबत घेतलं होत. अनेक महिन्यांनी स्वानंदी माझ्या सोबत ट्रेकला आली होती. मला खात्री होती कि बॅगची गरज पडेल म्हणून. तसंच झालं. साधारण २ किलोमीटरच्या ट्रेक नंतर तिला झोप आवरेना. अखेर बॅगेची मदत घ्यावी लागली. पहिल्या प्रवाहाजवळ पोहचल्यावर तिला गरम गरम मॅगी खाऊ घातली. आम्ही देखील या वातावरणात गरम मॅगी आणि चहाचा आनंद लुटला. सोबत माझी अजून एक ट्रेक मैत्रीण होती सोनाली, तिने देखील खूप धमाल केली. स्वानंदीची झोप आणि तिचं गारठण हे सांभाळण जास्त आव्हाहनात्मक होत. तिला बॅग मध्ये बसवलं. मग मात्र तिला देखील उब आली.
साधारण अर्धा तास आम्ही तिथेच थांबलो. निसर्गाचा आनंद घेतला आणि पुढील टप्यावर निघालो. अगदी १-२ मिनिटांमध्येच परत पुढचा धबधबा लागला. जिथे अजिबात गर्दी नव्हती. बॅग बाजूला ठेवली. पाणी जिथून येत होतं त्या दिशेला चालायला सुरुवात केली. वाह्ह काय नजारा होता तो! स्वच्छ शुभ्र फेसाळलेलं पाणी! मी, सोनाली आणि मोनिकाने तिथे खूप फोटो काढले. पाण्यात उड्या मारल्या. धबधब्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेतला. या ठिकाणी स्वानंदी देखील काही वेळ छान रमली. पावसाची ये-जा चालूच होती.
दोन तास या ठिकाणी वाहत्या निखळ पाण्याचा मनमुराद आनंद घेतला. पुढे परतीच्या वाटेवर लागलो. जंगलातून बाहेर पडताना एका झाड्याच्या बुंध्यांमध्ये गणपती बाप्पा अवतरले कि काय असा भास झाला. एव्हाना स्वानंदी रमली. ती देखील आता वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजाचे निरीक्षण करायला लागली आहे. पाऊस या वेळेपर्यंत पूर्ण थांबला होता. ती जाताना बरीच चालली.
जंगलातून आम्ही बाहेर पडलो तेव्हा दुपारचे १ वाजले होते. स्वानंदी ला चिखलात देखील उड्या मारायच्या होत्या. आणि तिने त्या भरपूर मारल्या. तिच्या आवडत्या पेपा पिग प्रमाणे! वातावरण फारच स्वच्छ झाल होत, त्यामुळे निसर्गाचा आणि हरिश्चंद्र गडाच्या परिसराचं रूप निघताना डोळ्यात भरून घेता आलं.
याच ठिकाणाचा पुढील ट्रेक ऑगस्ट महिन्यात आहे. नाव नोंदणी चालू. संपर्क ७५८८४९२०२०
जर ट्रेकला निघायचं असेल मात्र नेमकी कोणती तयारी करावी लागते हे जाणून घेण्यासाठी वाचा ट्रेकिंगला निघण्याआधीची पुर्व तयारी भाग १
लेख आवडला असल्यास तुमचा अभिप्राय जरूर कळवा. तुमच्या निसर्ग मित्र मैत्रिणीला शेअर करा.













Comments
Post a Comment