या क्षणी खरं तर मी हिमालयात असायला हवे होते. माऊंटेनिरिंग च्या पुढच्या कोर्ससाठी. या वर्षीच्या जानेवारीपासूनच जोमाने व्यायाम, वेळच्या वेळी आहार आणि उत्तम झोप याची शिस्त अंगी बाणली होती. अगदी उस्फूतपणे आणि आत्मविश्वासाने धिरांगकडे निघाले असते.. कारण माझ्या सोबत होता माझा मागच्या म्हणजेच २०१९ मध्ये केलेल्या बेसिक माउंटेनरटिंग कोर्सचा अनुभव.
मध्येच लोकडाऊन ची बातमी आली आणि कोरोनामुळे सगळं स्तब्ध झालं.....
आज जिथे असायला हवे होते तिथे तरी नाही आहे, पण जिथे गेले होते त्या आठवणी मात्र सोबत आहेत...
मनाच्या कप्प्यातील आठवणींचा हा अल्बम ... ते मंतरलेले २८ दिवस!
२८ कसले तब्बल ३४ दिवस मी माझ्या परिवारापासून - म्हणजे अडीच वर्षाच्या स्वानंदीपासून, आई-बाबा आणि नवऱ्यापासून दुर होते. सिक्कीमच्या - चेमचे गावात! ऑफिसमध्ये मॅनेजमेन्टच्या हाता-पाया पडुन, त्यांना विश्वासात घेऊन इतक्या दिवसांच्या सुट्टीच अप्रोव्हल मिळवलं होत. त्यानंतर सुरु झाली खरी करामत. कोर्ससाठी लागणारे सगळं साहित्य /सामान मिळवणे-विकत आणणे, घर-ऑफिस, संसार सांभाळून शाररिक क्षमता बनवणे.. आणि सर्वात महत्वाची म्हणजे मानसिकता सुद्धा. खरं सांगायचं तर मी मानसिकरीत्या अगदी शेवट पर्यंत तयार नव्हते.. मुलीपासून दुर जायचं ते पण ३३-३४ दिवस.... विचार करूनच पोटात गोळा यायचा. विमानात बसे पर्यंत सतत तिचाच विचार.. तिच्याच आठवणी, तिचाच स्पर्श.. एकही दिवस असा नव्हता कि तिच्या आठवणींनी डोळे पाणावले नसतील.. तरी मी गेले.. विमान उडालं आणि मी पोहचले सुद्धा..
 |
| सिक्कीम मधली आगळीवेगळी फळभाजी आणि हिरव्या-लाल रंगाच्या भयानक तिखट अशा मिरच्या. |
हॉस्टेलचा दिनक्रम संपल्यावर रोज रात्री साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर हेलिपॅडवर होत. आमच्या मोबाईलसाठीचा हॉटस्पॉट. याच ठिकाणी एखादी नेटवर्कची दांडी दिसायची.. कधी मुलीचा आवाज ऐकतीये असं व्हायचं. पण ती फार बोलायची नाही .. दोनच प्रश्न, "आई, तु कुठे आहेस आणि कधी येणार आहेस ?" मला विचार पडायचा कि काय आणि कस समजावू तिला कि महिना जायचा आहे. तिला काय कल्पना कि महिना म्हणजे काय किंवा ३० दिवस कसे मोजायचे ते..ते देखील आठवणींत .. आई शिवाय.
 |
| हॉस्टेलचं नयरम्य वातावरण. प्रदूषण म्हणजे काय हे विसरून गेलो होतो आम्ही. |
मी आणि तिचे बाबा तिला सांगायचो समजून कि मी ट्रेनिंग मध्ये आहे म्हणून.... आणि मी लवकरच येणार आहे.. तो लवकर येणारा दिवस अजून २५ दिवस दुर होता. हे मला समजत होत पण स्वानंदीला अजून काहीही त्याबाद्दक समजत नसावं..
हॉस्टेलवरच्या ट्रेनिंग चे १०-१२ दिवस असेच संपले २-४ मिनिटांच्या रात्रीच्या बोलण्यात. आता खरी परीक्षा होती आम्हा मायलेकींनी .. पुढचे १२-१५ दिवस न फोन असणार होता न कोणाचा आवाज ... माझ्यासाठी आयुष्यात त्या क्षणी होत ते म्हणजे १५-१६ किलोची बॅग घेऊन उंच डोंगरांवर चालणं, चालणं आणि फक्त चालणंच.आमचा बेस कॅम्प येईपर्यंत सतत ४ दिवस आम्ही चालताच होतो.तब्बल ४०-४५ किलोमीटरचा प्रवास तो पण चढणीचा. सकाळी ६ - ७ पासुन ते संध्याकाळच्या ६-७ पर्यंत म्हणजे १२ तास हा अखंड प्रवास चालूच राहायचा.
 |
| नीले गगन के तले , धरती का प्यार पले! बेसकॅम्प- तोरीफुले (१४१०० फुट उंची) कडे जाताना. |
स्वानंदीला घेऊन किल्ले चढायची सवय होती. त्यामुळे खुप थकले कि पाऊल उचलावस वाटत नसायचं. तंद्री लागायची. असं वाटायचं जिथे आहे तिथेच बसून राहावं .. तेव्हा भास व्हायचा स्वानंदीच्या आवाजाचा - "आई चल,चल पुढे. आणि मी पण आभासी आवाजाला खरोखर रेस्पॉसन्स देत होते - अगदी तसच जस किल्ले चढताना द्यायचे - " हो ग बाळा, चालते हं!" मला कोणासाठी तरी पुढे चालायचं आहे. या विचाराने पाऊले आपोआपच उचलली जायची ..
तिनेच तर मला घडवल होत या दिवसासाठी.
कुठं पर्यंत पोहचलो किंवा अजून किती अंतर चालायचं म्हणून जरा नजर वर घेतली कि असं वाटायचं अजून तर तिथेच आहे. नजर जाईल तिथपर्यंत पाहुन असं वाटायचं कि त्या पुढच्या वळणावर तिथे स्वानंदीच उभी आहे तिच्यासाठी म्हणून मला अगदी लगबगीने तिथे पोहचणं गरजेचे आहे. .. मला पुढे गेलं पाहिजे. असं करत तो दिवस जायचा अगदी रोजच असं करायचे मी.
'कांचनजुंगा' - शालेय जीवनात भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं नाव. तेव्हा तर बर्फाच्छादित डोंगर काय आणि कांचनजुंगा काय यांची टीचभर कल्पना देखील केलेली आठवत नाही आहे. तेव्हा मात्र तिच्या जवळ जाण्याची हिम्मत केली खरी. चढाईसाठी म्हणून भारतात सगळ्यात अवघड समाजाला जाणारा असा हा ट्रेक होता. "कांचनजुंगा, ऐसेही किसीको आने नहींदेती है। बहुत कष्ट उठाना पडता है। आमच्या एका सरांचं वाक्य आठवलं आणि त्या क्षणी मी ते कष्टच अनुभवत होते.
 |
| चार दिवसात पार करण्याचा रस्ता . त्याचा रोडमॅप आणि अंतर. |
 |
| कांचनजुंगा च्या टेरेन मध्ये प्रवेश. |
टप्याटप्याने आम्ही पुढे जात होते.
बेसकॅम्पवर सुरुवातीच्या ३-४ दिवसांनी आम्हाला गारठवलं होत. सतत बर्फवृष्टी आणि पाऊस. वातावरण वेगळच ,कधीच न अनुभवलेलं, धुरकट आणि ढगाळ.. न प्रकाश न ऊन. थंडी-वाऱ्याने हालत खराब. उभ्या आयुष्यात कधीच इतकी प्रार्थना केली नसेल जितकी प्रार्थना त्या ३-४ दिवसात केली ती देखील "सूर्यनारायणाची". वातावरण कसेही असले तरी ट्रेनिंग जोमात चालायचं. तिथे कसलेच लाड नाही न गया.
पाचव्या दिवशी अखेर"सुर्यनारायण" प्रसन्न झाले. धरणी मातेने पांढऱ्या ढगांमध्ये लपवून ठेवलेल्या एका चित्राचा पडदा अगदी सावकाशपणे सारायला सुरुवातझाली. अलगदपणे सार आभाळ मोकळं झालं. आम्ही सर्वे थक्क! सर्व प्रथम आपण कुठे आहोत आणि कुठून चालत आलो हे समजण्यात काही वेळ गेला. निसर्गाने समोर मांडलेला एकंदर नजराणा म्हणजे "स्वर्ग" असावं. त्यामुळे "स्वर्ग" या संकल्पनेची साक्षात प्रचिती मात्र इथे आली. कांचनजुंगा समोर. तिच्या सोनेरी,चमकणाऱ्या हिमशिखरांमुळे डोळे आणि मन अगदी भरून पावल.
 |
| स्वर्ग . पावसानंतर रोजच स्वर्गसुख अनुभवायचो. सकाळी ६ ते ११ बस्स. |
सकाळी ७ ला कोवळी उन्ह अंगावर यायची असं वाटायचं आज दिवसभर उन्हातच राहावं. "उन्हात न्हाऊन निघणं" म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने समजलं. थंड पडलेले हात-पाय शेकून तर नाही निघायचे पण हलकीशी उब मात्र जाणवायची. त्या दिवशी आमच्या बेस कॅम्पचा नजारा अगदी बघण्यासारखा होता. सगळे जण लवकर उठलेले.. बॅग मधले असतील नसतील ते सगळे कपडे टेन्टवर, बर्फ वितळून दिसू लागलेल्या दगडांवर, गवतांवर, जमिनीवर.. बघावं तिथे कपडेच कपडे. त्या दिवशी आमचा बेसकॅम्प अगदी रंगबेरंगी कपड्यांची सजून 'धोबी घाटाप्रमाणे' दिसत होता. त्या दिवशी सगळ्यांच्या डोळ्यातच एक वेगळी चमक दिसत होती.. जरा वेळाने शिट्टी वाजली.. सामान घेऊन निघण्याची.
या पुढील सर्व ट्रेनिंग आम्हाला आता ग्लेशिअर मध्ये पूर्ण करायची होती. पडलेल्या उन्हाच कौतुक उरकून आमची दिंडी निघाली. वाटलं होत इथेच असेल पोहचू अर्ध्या पाऊण तासात. कसलं काय सकाळी ८. ३० ला निघालो होतो पोहचे पर्यंत दुपारचे १ वाजले. ट्रेनिंग उरकून परतायला संध्याकाळचे ५ -६ वाजले. आता पुढल्या काही दिवसांकरिता हाच दिनक्रम .. उठायचं, ट्रेनिंग करायला ग्लॅशिअर मध्ये निघायचं, ट्रेनिंग करायचं आणि संध्याकाळी परतायचं.
रोज संध्याकाळी ट्रेनिंग वरून आल्यावर जेवण (दुपारचं) मग ७ च्या दरम्यान गरमागरम सुप किंवा चॉकलेट मिल्क (दुध पावडरच) मिळायचं. गरमागरम दुध घश्या खाली उतरवून पोटात जात असताना अनुभव खूपच 'हॉट' होता. त्या गरम स्टीलच्या पेल्याची उब शेकोटीच्या उबेप्रमाणे मोलाची वाटायची. अगदी जमेल ते म्हणजे, पायाचे तळवे, चेहरा, हात टेन्ट मध्ये बसल्या बसल्या आम्ही शेकून काढायचो.
 |
| आमचा छोटा हीटर. जिने का सहारा. |
एका टेन्ट मध्ये आम्ही तिघी जणी होतो. अगदी मिळून मिसळून राहायचो. दिवसभरातील थकावट संध्याकाळच्या गप्पा-टप्पांमधे विरून जात. दिवस जायचा मात्र संध्याकाळ झाली कि घराची आठवण आणि ओढ सतावत असे. आम्ही तिघी मनमोकळ्या गप्पा मारायला लागलो. कळी जशी हळूहळू उमलते तशी आमची आयुष्य एकमेकांजवळ उमलू लागली होती. माझ्या सोबत असलेल्या दोघींची लग्न झाली नव्हती त्यामुळे त्यांच्या गप्पा, त्यांचं कॉलेज मधलं आयुष्य,तारुण्यातील धमाल व वेगवेगळे प्रसंग गमतीशीर आणि तितकेच भावुक होते. माझं विश्व मात्र स्वानंदी भोवतीच फिरत होत. आमच्या गप्पांमुळे स्वानंदीच्या जन्मानंतर आमच्या दोघांच्या आयुष्यातील झालेल्या बदलावर आठवणरूपी प्रकाश पडला. त्या दोघीं नीं स्वानंदीचा फोटो बघण्याचा हट्ट केला. त्या दिवशी इतके दिवस बंद असलेल्या मोबाईलला प्राणवायू मिळाला होता. स्वानंदीचे फोटो आणि काही व्हिडीओ बघताना खुप खुप हसु आलं. नंतर त्या हसूच आठवणींनीमुळे रडू मध्ये रूपांतर झालं जे माझच मला कळलं नाही. वीस बावीस दिवसांनी तिला पहिल होत, तिचा आवाज ऐकला होता त्या मोबाईल मध्ये. आलेलं रडू त्या दिवशी खूप अनावर झालं होत. छातीत कसतरी झालं. एक क्षण तर वाटलं कि सुकलेला पान्हा फुटला कि काय. कधीच इतका जीव कासावीस झाला नव्हता, न आज पर्यंत मला इतकी कोणाची आठवण आली होती. हे दिवस म्हणजे माझी खऱ्या अर्थाने 'शाळाच' होती. एक एक शब्दाचा अर्थ मला प्रकर्षाने समजून येत होता. हे आज तागायत कधीच घडलं नव्हतं.
 |
| उंचावरून दिसणारा आमचा कॅम्प |
जवळच्या मित्र- मैत्रीणींनी मला आपापल्या तऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न करत होते पण मला कोणाचीच भाषा समाजातनव्हती . कारण, त्या सगळ्या चाळीस जणांमध्ये मी एकटीच "आई" होते. त्यामुळे मला नेमकं काय आणि कसलं दुःख अनावर होतंय ते मला त्यांना सांगणं कठीण जायचं. रोज झोपायच्या आधी दिवस मोजायचे, किती दिवस राहिले ते रोज वहीत लिहायचे आणि जो दिवस संपला आहे त्यावर काट मारायचे. .. फक्त ८ दिवस, ७ दिवस,६ दिवस .. असं बडबडत झोपी जायचे. वेड लागायला सुरुवात झाली कि काय असं वाटायचं. लागलंच होत. असं होत बरं का, हाय अल्टीट्यूट वर ! आता माझ्या वहीत लिहीत असलेले दिवस कमी कमी व्हायला लागले.
 |
| बर्फाची भिंत वर चढताना |
अखेर तो दिवस उजाडला. परीक्षेचा दिवस . इतक्या दिवसात जे जे म्हणून काही शिकलो होतो, अनुभवलं होत, सहन केलं होत त्याची परीक्षा. सकाळी ६ ला बेसकॅम्प सोडला. ८. ३० वाजता ग्लॅशिअर मध्ये जिथे पोहचायचं होत त्या जागी रिपोर्टींग केलं. पटकन बर्फातले शूज घातले. पुढील टप्याकडे मोर्चा वळवला. बर्फाची भिंत दोरीच्या साहाय्याने चढून जायचं होत. काय झालं काय माहीत मला मी एका ठिकाणी अवघे एक मिनिटे अडकले न वर चढता येत होत न खाली जाता येत होत. शेवटी इंस्ट्रक्टरने मला स्वानंदीची आठवण करून दिली- "Common Snehal, you are strong mother. You can do this" एक क्षण मोठा श्वास घेतला आणि होती नव्हती ती ताकद लावून त्या अडकलेल्या दोरीवरून पुढे वर चढले. आता पुढचा शेवटचा टप्पा साधारण १०० -१५० मीटर असेल. संपूर्णपणे भुसभुशीत बर्फातून जाणारा तो रस्ता.... न संपणारा.. शेवट दिसत होता पण रस्त्याचा शेवट येत नव्हता.

दहा-बारा पावले चालून नजर वर व्हायची. एकेका पावलाला मी स्वतःला समजवायचे -काहीही करून मला तिथे पोहचायचं आहे. स्वतःला इतकं मोटिवेट मी कधीच केलं नव्हतं जेवढं त्या दिवशी केलं... आधी पोहचलेली मंडळी मला आवाज देत होती. .. टाळ्यांनी माझं मनोबल वाढवत होती. .. तरी मी अजुन बरीच दुर होते.. आता अंगातलं त्राण संपलं होत. ती पाच पावलं ५०० पावलां इतकी दुर वाटत होती. तितक्यात आधी पोहचलेल्या आणि माझ्या सोबत टेन्ट पार्टनर असलेल्या एका मैत्रिणीचा आवाज कानावर पडला.. " "Common Snehal, "Common, remember family, Swanandi !!" अक्षरशः हत्ती गेला आणि शेपूट राहील होत. नंतर मोठ्ठा श्वास घेतला. अखेर ती शेवटच पाच पावलं सटासट चालले (असं मला वाटलं) आणि पहिल्या दहा जणांमध्ये १९,५०० फुटावर पोहचलेल्यांपैकी मी एक होते ..मी माझ्या ध्येयापर्यंत पोहचले होते.
 |
| शेवटची दहा पावले देखील जड झाली होती. |
सरांनी मला शाबासकी दिली. सगळ्यांनी मनापासून स्वागत केलं. पाठीवरची बॅग खाली ठेवली. घोटभर पाणी प्यायले.. मती भानावर आली. स्पर्धा नसताना देखील जिंकल्याचा आनंद मी त्या क्षणीअनुभवत होते. कळत न कळत घरातल्या सर्वांचे चेहेरे सरसर डोळ्यापुढे येत होते. घरातील सगळे.. अगदी हयात नसलेली आज्जी देखील. मला जाणवत होत ते माझे टाळ्यांनी कौतुक करत आहेत. (असा भास व्हायला लागला होता.) आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी भन्नाट केलं होत, जिंकल्याचा आनंद नेमका काय असतो ते समजलं होत. त्या ठिकाणी मी कृतकृत्य झाले होते.त्याचे साक्षीदार म्हणजे माझे अनावर झालेले अश्रू . जे आपोआपच गालावरून वाहत होते. जगलेले मागचे सर्व अथक श्रमाचे ते दिवस आठवले, मुलीपासून - घरादारापासून दूर राहिल्याचं सार्थक झालं असं वाटल. मी शांत झाले. माझ्यात देखील 'अलका कुबल' लपली आहे याची जाणीव या सर्व दिवसांमध्ये झाली.
 |
| रोहन आणि अमित माझे मित्र. समिटच्या दिवशी माझं मनोधैर्य वाढवण्यात यांचा खारीचा वाटा आहे. |
माझ्या सोबतच्या मित्र-परिवारासोबत विजयाचे ते क्षण कॅमेरामध्ये टिपले. सकाळचे सव्वा अकरा वाजले होते. चारही बाजूला नजर टाकली.. आज खरोखरच निसर्ग देवता आमच्यावर प्रसन्न होती. वातावरण खूपच पोषक होत. .. दूर वरच पण सहज नजरेत टिपता येत होत. .. निसर्गाच्या रुपाला उधळण आली होती. बर्फाचे मऊ डोंगर आणि त्याच्या वलयरेषा म्हणजे एखाद्या चित्रकाराने आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई करून काढलेल्या एखाद्या लोभस चित्राप्रमाणे वाटत होते. तो क्षण मी जगले.. खऱ्याखुऱ्या अर्थाने.. मोकळा श्वास घेतला. जरा वेळाने खाली बेसकॅम्पच्या दिशेने प्रवास चालू केला. खरंच प्रत्येकाचा एक दिवस असतो. तो दिवस माझा होता आणि माझ्या सर्व गिर्यारोहक सोबत्यांच्या.
आता उद्याचे, म्हणजे बेस कॅम्प सोडायचे वेध सगळ्यांना लागले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सामानाची आवरा-आवार केली. इतके दिवस ज्या टेन्ट्स नि आम्हाला खडतर वातावरणापासून वाचवलं, आसरा दिला त्याला आता आम्ही गुंडाळून ठेवलं होत.आज सगळ्यांचे चेहरे फुलले होते. शेवटच्या दिवशी कॅम्पसाईट एखाद्या लग्नघराप्रमाणे वाटत होती. तसाच आनंद ,उत्साह, वर्दळ, लगबग सगळं सगळं होत. सबंध वातावरण हसत-खेळत झालं होत.
बेसकॅम्प वरूनच आमच्या दिशेला येणाऱ्या याकची स्वारी नजरेस पडली. ते सारे वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा, लुसलुशीत ताज्या गवताचा आनंद घेत मस्त रमत-गंमत आमच्या कडे यायला निघाले होते. किचनच सामान आणि आमच्या सर्वांचे टेन्ट्स याक वर टाकून आम्ही बेसकॅम्प सोडायला सज्ज झालो.
 |
| सुरक्षित अंतर ठेऊन काढलेला फोटो. इतक्या जवळून पहिल्यांदाच याक पाहायला मिळाला. |
आनंद ओसंडून वाहत होता. एक क्षण मागे वळून ओझरती नजर टाकली. जरासं वाईट वाटलं. काही दिवसांपूर्वी जिथे सगळ्यांचे रंगीबेरंगी टेन्ट्स दिमाखात उंभे होते, जिथे जेवलो, आनंद-दुःख वाटून घेतली, जिथे आकाशातील तारका लक्ख पणे पाहता आल्या, जिथे पहाटे पहाटे रोज कांचनजुंगेच सोनेरी लखलखत रूप आम्ही न्हाहाळायचो, जिथे तिरंगा फडकावला, जिथे रोज राष्ट्रगीत गायलं - "विंध्य हिमालय" जिथे अनुभवला- त्या ठिकाणाला सोडून आम्ही पुढे निघालो होतो.
 |
| पहाटे चार वाजताचे सौंदर्य! |
एका डोळ्यात घराकडे निघालेला रस्ता आणि दुसऱ्या डोळ्यात ज्या रस्त्यांनी मला घडावल तो!
अखेर एक क्षण दोनही डोळे घट्ट मिटून घेतले आणि पाउल उचललं .... अखेरचा निरोप घेतला.. त्या जागेला शतशः प्रणाम करून !
खाली येईपर्यंत गप्पाटप्पांमध्ये मूड नॉर्मल झाला होता. रोजच्या पेक्षा अंगात वेगळाच हुरूप जाणवत होता. मला ठाऊक होत आज तर मला काही घरी कोणाशी बोलता येणार नाही आहे मात्र उद्या किंवा परवा नक्कीच मी घरच्यांशी बोलायला मिळेल. फक्त आशेवर दिवस ढकलायचे होते.(जे अत्ता आपण करत आहोत. लोकडाउन मध्ये)
 |
| मागे दिसणारा माउंट पंडीम . |
आता उद्याच्या आणि परवाच्या दिवसाची वाट पाहत होते. आम्ही डोंगर उतरून ४-५ किलोमीटर खाली आलो. त्या दिवशीचा स्वयंपाक आम्हा विद्यार्थ्यांकडून आमच्या इन्ट्रक्टर्स, डॉक्टर ,शेर्पा आणि कुक यांना आम्ही आठवण रुपी भेट व आभार म्हणून जेवण बनवायचं ठरवलं. साधारण ५० लोकांचा स्वयंपाक ठरला. त्यात रोटी, पुलाव, बटाटा भाजी आणि खुसखुसची भाजी (सिक्कीम मधील एक पेरू प्रमाणे दिसणारी फळभाजी) हा बेत ठरला. कोण काय करणार आणि कोण काय नाही करणार हे देखील ठरवून सगळे आपापल्या कामाला लागले. अगदी हेड टॉर्च धरण्यासाठी देखील माणसे नेमण्यात आली. त्या दिवशी जेवण फक्कड झालं. संपूर्ण भारतातील सर्व राज्यांची चव त्या जेवणाला आली होती. सर्वानी आमचे तोंडभरून कौतुक केल.
 |
| सगळ्यांनी बनवलेलं स्वादिष्ट जेवण.. २८ दिवसातील पहिली चपाती.. |
तो दिवस तिथे संपला. अजून ३ दिवसांचा प्रवास होता. दुसऱ्या दिवशी श्लोकाला पोहचायचं होत. १५-२० दिवसांपूर्वी याच रस्त्यानी गेलो होतो का ? हा प्रश्न पडला. कारण त्यादऱ्या-खोऱ्यांमध्ये अफाट सौंदर्य लपलं होत. पाठीवरच्या किंवा डोक्यावरच्या टेंशनच्या ओझ्यामुळे कि काय जातेवेळी ते सौंदर्य ना न्हाहाळता आलं ना सहज पाहताच आलं. पण त्या दिवशी अगदी पहिल्या दिवसांपासून दिसणारा माऊंट पंडीम ढगांच्या मागे लपून छपून आमच्या सोबतीचा आनंद घेत होता आणि आम्ही देखील त्याच्या. फारच सुंदर होत त्याचं रूप. हे असलं अस्सल,निखळ सौंदर्य प्रयत्न केला तरी कॅमेरामध्ये टिपता येत नव्हता. त्याला उघड्या डोळ्यांनी पाहण्यात जे समाधान आहे हे कॅमेऱ्यात नाही. मन भरलं. ती देखील जागा आम्ही सोडली. सकाळी ८ पासून आम्ही चालत होतो. साधारण दुपारच्या ३ च्या आसपास श्लोका गाव नजरेस पडलं. जीवात जीव आला.
तब्बल अर्धा तास मी एका वाटेवरच घुटमळत होते. तिथून गाव सहज नजरेस पडत होत. कारण मला एक व्यक्ती फोनवर बोलतानादिसली . मी माझा फोन चालू केला. माझ्या फोनची रेंज पकडत नव्हती म्हणून जीव कासावीस होत होता. अखेर फोन लागला. आईशी बोलले. कधीच तिला मी मनापासून थँक्यू बोलले नव्हते न कधी कळवळून तिची आठवण काढली होती. त्या क्षणी माझ्या आईने माझ्या मुलीची तिची आई म्हणून जे जे काही केल असेल त्या विचाराने मनोमन मी आईला नतमस्तक झाले होते. खरंच, रोज नसतो असा दिवस, रोज नसतात अशा भावना आपल्या कोणासाठीच. त्या दिवशी होत्या. घरातील प्रत्येकासाठी माझे वडील, बहीण, तिचा नवरा आणि माझा नवरा देखील. कारण, या सर्वांमुळेच आज मी हे अनोखे जग पाहत होते,अनुभवत होते,काहीतरी नवीन शिकत होते.
दोन मिनिटांमध्ये इतक्या सगळ्या विचारांनी आणि भावनांनी मला सैरावैरा करून सोडलं होत. आईला निरोप मिळाला.. मी ठीक आहे आणि अगदी व्यवस्थित आहे. आता वेळ आली होती फोन ठेवायची .. ओके आई, बाय ग ,काळजी घे, लवकर ये ..नीट ये ..सगळं सगळं बोलून झालं. .. माझा कंठ दाटला आणि अश्रुंना वाट मिळाली. मी देखील हलके झाले. आईने मला कदाचित पहिल्यांदाच मला इतकं भावुक झालेलं अनुभवलं असेल. हजारो किलोमीटर दुर असून देखील तिला समजत होत मला काय सांगायचं आहे ते. मी न बोलताच माझ्या हुंद्क्यातून बरंच काही समजलं तिला. ३-४ सेकंद आम्ही दोघीही काहीही बोललो नाही. न बोलताच काहीतरी ऐकायचा प्रयत्न करत होतो.. मनाचा आवाज. .. शेवटी आई उद्दगारली- "आहोत आम्ही".. अन फोनच्या बॅटरीने जीव सोडला. रडक तोंड, सुजलेले डोळे नॉर्मल व्हायला १५-२० मिनिटे गेली. मन हलकं झालं होत. कारण फार काही न बोलता सुसंवाद झाला होता.. हेच असतं -"आईपण". ते ही शिकले या १० मिनिटाच्या प्रसंगातून.
 |
| आमचे मास्तर.. शेवटचा चहा. |
दुसऱ्या दिवशी हॉस्टेल गाठायचं होत. आठवतो आहे तो दिवस. ८ ऑक्टोबर २०१९ - दसरा. त्या दिवशी सकाळी पाच पासून पावसाने थैमान घातला होता. तरी सकाळी ५. ३० ला आम्ही सर्वानी श्लोकाचा निरोप घेतला आणि जोरदार स्पीडने १८ किलोमीटरचं अंतर अवघ्या चार तासात पार करून सकाळी ठीक १०.३० वाजता डांबरी रस्त्यावर एका लाईनमध्ये उभे राहिलो. खूप अनेक आठवडयांनी गाड्या पहिल्या, खुप लोक रस्त्यावर पहिली, लहान मुले पहिली,त्यांच्यात स्वतःच्या मुलीला देखील पाहिलं. खुश झाले.
युक्स्युमला पोहचलो. अनेक दिवसांनी लाईटची बटण पहिली. ताबोडतोब फोन चार्जिंगला लावला. घरी दसऱ्याच्या सर्वाना शुभेच्या दिल्या. अगदी माझ्या चिमणीला देखील. काहीही न विचारता तेव्हाही म्हणजे इतक्या दिवसांनी तिचे तेच दोन प्रश्न होते - जे पहिल्या दिवशी होते.. "आई तू कुठे आहेस आणि कधी येणार आहेस ". पण मी तेव्हा नाराज नव्हते. कारण माझ्या कडे आज उत्तर होत आणि तिच्याशी बोलताना मी अगदी उत्साही होते. मी खूप विश्वासाने तिला सांगितलं कि मी ४ दिवसांनी येणार आहे. चार दिवस - बोलायला सहज वाटलं . कारण तो एकेरी आकडा होता. पण मला ठाऊक होत कि तिला चार दिवस म्हणजे नेमके किती दिवस याचा अंदाज नसावा.
 |
| चिमुरडी मुले.. सर्वांत लहान मुलगी स्वानंदीप्रमाणे वाटली |
दुपारी ३ वाजता आमची बस सर्वाना घेऊन ट्रेनिंग सेंटर म्हणजेच होस्टेलवर निघाली. रात्री १० वाजले पोहचायला. थकल्यामुळे पटकन झोप लागली. दुसऱ्या दिवशी बॅग पॅक केली. लेखी परीक्षा झाली. उद्या निघायचं या आनंदात लक्ष घडाळ्याकडे जात होत.. उद्या या वेळेला मी इथे असेल , त्या वेळेला तिथे असेल,डोक्यात गणित चालू झाली. होस्टेलवरच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांनी धमाल केली. ग्रॅज्युएशन सेरेमनी सारखा शेवटचा दिवस पार पडला. खूप नाचलो. सगळ्यांचे हिडन टॅलेंट बाहेर पडत होत. मला संधी मिळाली कि मी नाचून घेते.. आवडत मला. त्या दिवशी खूप दिवसांनी मग्न होऊन आम्ही सगळे नाचत सुटलो होतो.. त्या नाचगाण्यातच तो दिवस संपला.
 |
| शेवटचा दिवस.. मस्त डान्स केला. |
सकाळी ६ ला उठून मी तयार झाले. आज हॉस्टेल ला गुड बाय म्हणायचं होत. कोणाच्या घश्या खाली नाश्ता उतरत नव्हता. आमच्या सरांना आम्हाला बाय, निघतो, ते देखील म्हणवत न्हवत. सगळे शांत होते. सर्व सरांनी आम्हाला बाय केलं. नेहमी कठोरपणे आम्हाला ओरडणारे, आम्हाला पळवणारे, रडवणारे सर्व इन्स्ट्रक्टर खुप भावुक झाले होते . डोळे पाणावले होते,नाकं-कान भावना दाटून आल्यामुळे लाल झाले होते. त्यांच्या सोबत आम्ही देखील. सर्वानी आपापल्या रितेने एकमेकांचा निरोप घेतला.
चेमचे गाव - वाटलं देखील नव्हतं कधी मी इथे येईल म्हणून, सिक्कीमच्या एका कोपऱ्यात जिथे खऱ्या अर्थाने निसर्ग सौंदर्य बहरलेलं आहे, ना कसलं प्रदुषण, न कसला आवाज. इथले लोक प्रेमळ. अगदी प्रामाणिक आणि शांत. जितके शांत तितकेच काटक. मला इथे फिरताना कोणीही ओव्हर वेट दिसलं नाही. ना कोणती जिम तिथे दिसली. मातीशी जोडलेली माणसं. गावात सहज फेरफटका मारला असता दिसून येते कि घरातील स्त्री घराबाहेरील कुंड्यांमध्ये सतत काहीतरी काम करत असते. प्रत्येक घराच्या बाहेर रंगीबेरंगी फुलांच्या पद्धतशीरपणे कुंड्या रचलेल्या. लाल,गुलाबी,पिवळ्या,केशरी,पांढऱ्या रंगांची अशा सदाबहार फुलांनी प्रत्येक घराचं आंगण सजलेलं दिसत. त्यामुळे घर लहान असलं तर बहारदार दिसायचं.
चेमचे गाव सोडलं. दुपारी ३. ३० वाजता मी सिलगुडीला पोहचले. प्रमुख मार्केटच्या गल्लीबोळात फिरले. तिथेही आहे बर का आपल्यासारखी तुळशीबाग. मुलीसाठी-पुतण्यांसाठी मस्त कलरफुल जॅकेट्स घेतली. वेगवेगळे चॉकलेट्स आणि जेली घेतल्या. मनसोक्त फिरले. दिवस संपला अजून रात्र जायची होती. उद्या मी रात्री ९ वाजता या वेळी माझ्या घरी, माझ्या माणसांमध्ये असेल या विचारानेच या विचारानेच मन थुईथुई नाचायला लागायच. या विचारात कधी डोळा लागला माहित नाही.
सकाळी ६ ला जाग आली. ८. ३० वाजता एअरपोर्ट गाठलं. विमान बंगलोरकडे झेपावलं. दुपारी बारा ते पाच पुन्हा एकदा माझ्या संयमाची परीक्षा. पुढच्या विमानाची म्हणजेच पुण्याच्या विमानाची वाट पाहायची होती. ती वेळ निघून गेली. शेवटी पुण्याला आले. स्वानंदी समोर जाण्याआधी नीट आवरलं. काळवंडलेला चेहरा-ओठ, ड्राय पडलेली स्किन, पाच एक किलो कमी झालेलं वजन, काळी झालेली नख तिच्यापासून कशी लपवू समजत नव्हतं. एअरपोर्टच्या बाहेर आले. आईssss म्हणून मुलीने आवाज दिला. मागे वळून पाहिलं. पटकन पळत गेले आणि तिला उचलून घेतलं. मिठी मारली,खूप खूप पापी घेतली, तिला हवेत भिरकावलं. एका जागी शांत बसले तिला माझ्या कुशीत घट्ट पकडून. तिने माझ्याकडे पाहिलं मी पण तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्या वरील हसू मुळे पुन्हा एकदा मी जिंकले होते.आमची भेट सगळेच पाहत होते. सगळी लोकं स्तब्ध झाली होती. डोळे पाणावले. तिने माझ्या गालाला हात लावला (मला वाटलं डोळे पुसेल) आणि म्हणाली- "किती काली झाली आहेस तू".. मी आश्रू लपवत हसले आणि घराकडे निघाले.
 |
| अखेर आम्ही ३४ दिवसांनी भेटलो. .एअरपोर्ट वरचा आनंदमय क्षण !! |
खूप काही शिकवून गेले हे अठ्ठावीस दिवस.
मला असं वाटत आपण सगळे सध्या अशाच परिस्थितीत आहोत. खूप इच्छा आहे तरी वेळे सोबतच चालावं लागत आहे. जी वेळ आहे त्या वेळेला,क्षणाला अनुभवल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. जेव्हा आपण हतबल असतो (असं आपल्यलाला वाटत) तेव्हा शांत राहिण योग्य. संयम हाच पर्याय! योग्य वेळच सर्व ठीक करते. आहे तो क्षण आनंदात आणि जे आहेत त्यांच्या सहवासात घालवला हे परिस्थिती शिकवून जाते, तसेच केले पाहिजे. जे आपलं आहे ते आपलाच राहते. काही असे क्षण येतात आयुष्यात कि काय करावं ते समजत नाही. अगदी जसा माझ्या आयुष्यात आला, कि खरंच मुलीला सोडून एक महिनाभर मला जायला पाहिले का ? मन आणि मेंदु दोनही जण आपापल्या परीने मला मागे ढकलत होते. मी मात्र ठाम होते. कारण, स्वानंदी माझीच आहे, नेहमीच माझ्या सोबत असणार आहे, पण मिळालेली ही संधी नेहमी आपल्यासाठी असू शकते का ? मान्य आहे,
त्रास होईल पण यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. त्यागा शिवाय फळ नाही हेच सत्य.
जितका वेळ मी तिच्या शिवाय घालवला तो संपूर्ण वेळ मी आज घरात या लोकडाऊन मध्ये तिच्यासोबत आणि माझ्या परिवारासोबत अगदी आनंदाने घालवत आहे.
Comments
Post a Comment