१० वर्षांनंतर ... ढाक सुळका प्रस्तरारोहण मोहीम
वेळ आहे , चला ट्राय करू, अशा विचाराने या सुळक्याकडे अजिबात पाहू नये. डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या खोल दऱ्या , सटकन पाय निसटणारी चढण आणि होल्ड म्हणून पकडलेल्या दगडाची टिकून राहण्याची अनिश्चितता यांमुळे दिसायला उंचीने लहान असला तरी धोकादायक असा हा कळकराय समोरील 'सून' किंवा 'ढाकचा' सुळका.
अनेक वर्ष म्हणजे जवळ जवळ १० वर्ष झाली असतील या सुळक्यावर इतक्यात कोणीही चढाई केली नव्हती. कारणे बरीच असू शकतात. त्यातील काही पुढील प्रमाणे:-
- एकतर हा जेमतेम ८० फुटी सुळका.
- या सुळक्यावर बोल्टिंग नाही.
- सुळक्यावर रोवलेल्या ३ मेखा आणि उजव्या बाजूला एक रिंग बोल्ट त्याच्या आधारावर चढाईची जोखीम उचलणे आवाहात्मक नक्कीच आहे.
- चढाई दरम्यानची स्क्रि
सुळक्याच्या पायथ्याशी विश्रांती
दुपारी १ च्या आसपास वाजले असतील. वातावरण उत्तम होते. हवेतील थंडाव्यामुळे शरीरात उर्जालहरी फिरत होत्या. भुकेची वेळ जवळ आली होती मात्र, कळकराय च्या खिंडीतील उपद्रवी माकडांमुळे डबे उघडायची हिम्मत तिथे काही झाली नाही. कळकरायच्या चढाईनंतर सगळं सामान घेऊन आम्ही आमच बस्तान ढाकच्या खिंडीत हलवायचं ठरवलं. काहीवेळ चालून सुळक्याच्या दिशेने नवीन वाटेचे शोध लावत, झाडीत रानडुक्करांच्या पावलांनी तयार झालेली वाट पकडली, त्या चढणीने आमची चांगलीच वाट लावली. प्रचंड झुडपांची गर्दी आणि चांगलाच चढ! त्यात स्वतःच सामान,रोप, इतर चढाईसाठी लागणार साहित्य यांमुळे चांगलाच घाम फुटला. अगदी समोर दिसणाऱ्या ढाकच्या सुळक्याकडे पोहचण्याकरिता चकवा लागली कि काय अशी शंका मनात येऊ लागली.
कारवीच्या मदतीने तो सरळ चढ चढून त्या अंधाऱ्या वाटेवरून आमची टीम बाहेर आली. डावीकडे ढाक सुळका तर उजवीकडे ढाकचा किल्ला आहे हे मात्र निश्चित झालं. आता आम्हाला खिंड दिसू लागली. त्या दिशेने पुढे गेलो तेव्हा आम्ही ढाक सुळक्याच्या खिंडीत पोहचलो होतो. पाठीवरच सामान खाली ठेवलं. शांत बसून श्वास मोकळा केला. त्यानंतर ज्या कार्यकर्त्याने (तुषार दिघे) आम्हाला त्या वाटेवरून चला आणि चाला असं सांगितलं त्याचा (शिस्तीत) शाब्दिक सत्कार करण्यात आला. सध्या त्या वाटेल आम्ही - 'डुक्कर नाळ' असेच संबोधतो.
पोटापाण्याची सोय
कळकराय पेक्षा हा सुळका उंच ठिकाणी असल्यामुळे ढाकचा सुळका लहान असला तरी मोठाच वाटतो. ही खिंड झाडीत नसल्यामुळे माकडांचा काही त्रास जाणवला नाही. माणसांची, गुरु ढोरांची वर्दळ या ठिकाणी क्वचितच असेल असं एकंदर पाहण्यात आलं. पोहचलेल्या ठिकाणाची पाहणी करून, असलेल्या सामानाची रचना करून चिंचोळ्या अशा त्या खिंडीत आम्ही सर्व असे बसे जेवायला बसलो. उतरणीवर बसावे लागत असल्या कारणाने बसण्यासाठी समतोल राखणे कठीण जात होते. एक एक डबे उघडायला लागले. मोदक, भाज्यांचे दोन- चार प्रकार,शेंगा, चटण्यांनी प्रत्येकाची ताट सजली. त्या पदार्थानी सगळ्यांची पोट टम्म केली. आत्मा तृप्त झाला. तृप्त झालेल्या आत्म्याला आता ८० फुटी सुळका ८०० पेक्षा फुट उंचीपेक्षा जास्त भासू लागला होता. पण परतीच्या प्रवासाची वेळ लक्षात घेता सुरक्षितपणे उरकत घेणे गरजेचे होते. नाहीतर एक-पाचेक मिनिटांची पडी तर निश्चितच होती. (हे आम्ही दर वेळेला ठरवतो पण नाही जमत).
जेवणाने संतुष्ट झालेल्या आणि सुस्त शरीराला जागवून आम्ही सर्वानी हार्नेस घातलं, गरजेचे साहित्य ज्यांनी त्यांनी घेतलं. चढाईच्या बाजूची आम्ही पाहणी केली. लावलेल्या मेखांची मजबूत आहेत कि नाही हे देखील तपासून घेतलं. गरज पडेल म्हणून आम्ही देखील आमच्या मेखा व साहित्य घेऊन तयार होतो. पण ज्यांनी कोणी त्या मेखा बसवल्या होत्या त्या आजही मजबूत आणि चांगल्या अवस्थेत आहेत याची शहानिशा झाली व चढाई करू शकतो हे देखील निश्चित झाले. आमच्या टीम मधील कृष्णा याने सर्व प्रथम चढाईस सुरुवात केली, लावलेल्या मेखांचा वापर करून त्याने मजबूत सुरक्षित मार्ग शोधून काढला.मोजून १० मिनिटात त्याने तो सुळका सर केला. कृष्णा नंतर 'डुक्कर नाळेचा' शोध लावलेल्या तुषारने बाजी मारली.
आत मला चढाई करायची होती. मी त्यांच्यात शिकाऊ असल्यामुळे चढताना होल्ड्स म्हणून पकडण्यात आलेले २ - ३ दगड माझ्याकडून उचकटत होते. तेव्हा मला सुळक्यावरील 'स्क्रि' ही संज्ञा स्पष्ट समजली. स्वतःच्या वजनाचा भार सावरत व कमीत कमी पाडापाडी करत मी देखील माथा गाठला. त्यांनतर मनोज ने उत्तम आणि पटकन चढाई केली. आम्ही सर्व जण म्हणजे ५ जण एकामागोमाग एक चढत राहिलो. सगळे वर आले. आता आपल्या सगळ्यांच्या वजनाने हा सुळका तग धरून ठेवेल का या बद्दल चर्चा रंगली. सर्व परिस्थीचा अंदाज घेत आम्ही सुळक्यावरील त्या पसरट, निमुळत्या , जेमतेम आठ-दहा पावलात संपून जाणाऱ्या अश्या माथ्यावर उभे राहिलो. अर्थात, आम्हाला फोटो काढायचा होता.
एक निवांत क्षण.. पुढे दिसणारा कळकराय सुळका
माझे बाकीचे सहकारी येई पर्यंत सुरक्षा रोप बांधून मी तिथल्या परिसरावर नजर फिरवली. माझ्या लक्षात आलं कि मी त्या परिसरातील सगळ्यात उंच जागी उभी आहे, कळकराय वरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा आणि ढाक या सुळक्यावरून दिसणारा नजारा नक्कीच काही अंशी वेगळा आहे. त्या क्षणी माझ्या आजूबाजूला माझे सहकारी होते तरी मी एकांत क्षण अनुभवत होते. .. वारा माझ्याशी बोलत होता ... पडून गेलेल्या पावसाच्या सरींचा सुवास वातावरणात मिसळला होता, हवेतील गारव्याचा स्पर्श नाकातून फुफुसापर्यंत पोहचत होता.. एक आगळी प्रसन्नता होती तिथे.. खूप खप वर्षांनी म्हणजे तब्बल १० किंवा त्यापेक्षा जास्तच वर्षांनीआम्ही तिथे यशस्वी चढाई केली होती. ते संपूर्ण जंगल, डोंगर आमचं अभिनंदनच करत होते असं मला जाणवलं. दूरवरून जंगलातील मोरांनी देखील आम्हाला पहिला कि काय म्हणून ते देखील आवाज करत होते. या क्षेत्रात आल्यावर निसर्गाचा आवाज आणि भाषा समजून घ्यायला शिकलं पाहिजे. कारण 'शिकला तोच टिकला'!
कळकराय च्या पुढे लहान असं टोक दिसत आहे तोच सून सुळका
लहान मुलांच्या झुकगाडीच्या डब्यांप्रमाणे एका मागे एक अशी रांग करून आम्ही आमचं फोटो प्रकरण आवरत घेतलं. उतरण्यासाठी बिले रोप आणि सेफ्टी अँकरसाठी देखील एक मेख सपाट जागी उत्तम स्थितीत होती. तिचा वापर करून आम्ही एका मागे एक सर सर खाली आलो. सगळे सुरक्षितपणे खाली आलो. रोप,सामान सगळं नीट घेतलं. संध्याकाळच्या चार च्या दरम्यान परतीच्या वाटेला लागलो.
पुन्हा लवकरच कि परत १०-१२ वर्षांनी तिथे कोणी चढाईसाठी जाणार आहे त्याची वाट हा 'ढाकचा' (सून) सुळका पहात आहे.
ठिकाण - ढाक किल्ल्याजवळ च्या खिंडीत
सुळक्याची उंची - ८०-९० फूट
राहण्याची सोय - ढाक गुहा
पाण्याची सोय - गावात
टप्पे -१
श्रेणी- सोपी मात्र स्क्रि खूप
अधिक माहिती - सकाळी लवकर सुरुवात केली तर एकाच दिवशी कळकराय आणि ढाक हे दोनही सुळके चढता येऊ शकतात. जाणकार व्यक्ती सोबत नसल्यास,विना साहित्य चढाई करणे धोक्याचे ठरू शकते.
लागणार वेळ - १ तास पुरे (किती जण आहेत यावर अवलंबून आहे, दिलेली वेळ ५ जणांकरिता नोंदवण्यात आली आहे.)
* सुळक्यावर कोणतेही बोल्टिंग नाही त्यामुळे क्लाइंबिंग सुरक्षित करण्यासाठी स्वःताचे साहित्य घेऊन जाणे.
लेख आवडला असल्यास या पेज ला like आणि follow करा. या क्षेत्रातील तुमच्या तीन गिर्यारोहक (ट्रेकर) मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा म्हणजे त्यांना या पानावरील नवनवीन ठिकाणांची, चढाईची माहिती मिळेल.


Comments
Post a Comment